७०० कोटी टनचा अंदाज; आयात शुल्काचा परिणाम राहणार

चालू आर्थिक वर्षांत देशाची सोने आयात ७०० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास गेल्या वित्त वर्षांच्या तुलनेत ही आयात अधिक नोंदली जाईल.

मौल्यवान धातू क्षेत्रातील आघाडीचा मंच असलेल्या रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) ने हा अंदाज व्यक्त केला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रवीणशंकर पंडय़ा यांच्या म्हणण्यानुसार, २०१७-१८ मध्ये भारताची सोने आयात ७०० टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षांत देशाची सोने आयात ५०० कोटी टन नोंदली गेली होती.

सोन्यावरील आयात शुल्क १० टक्के असल्याने त्याचा काळा बाजार वाढत असल्याचे स्पष्ट करत पंडय़ा यांनी हे आयात शुल्क ४ टक्क्य़ांवर आणण्याची आवश्यकता मांडली. याबाबत मौल्यवान धातू क्षेत्रातून वेळोवेळी सरकारकडे मागणी केली गेली असून यंदाच्या अर्थसंकल्पात या त्यावर निर्णय होण्याची अपेक्षाही पंडय़ा यांनी व्यक्त केली.

१० टक्के आयात शुल्कामुळे सराफ व्यावसायिकांना भारतात व्यवसाय करणे आव्हानात्मक बनले असून परिणामी या उद्योग वाढीकरिता ते अडथळ्याचे बनल्याचेही पंडय़ा म्हणाले.

जानेवारी २०१८ पासून आखाती देशांमधून येणाऱ्या सोने तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांवरील प्रत्येकी ५ टक्के मूल्यवर्धित कर तसेच आयात शुल्कामुळे भारताच्या या क्षेत्रातील निर्यातीला फटका बसत असल्याचे परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सब्यसाटी रे यांनी म्हटले आहे.

भारतातील निर्यात होणाऱ्या एकूण ७.५ अब्ज डॉलरच्या दागिने निर्यातीत दुबई देशाचा हिस्सा निम्मा आहे. चालू वित्त वर्षांत भारताच्या रत्ने व दागिने क्षेत्राची निर्यात स्थिर, ४३ अब्ज डॉलर राहण्याचा अंदाजही परिषदेने व्यक्त केला आहे.

जागतिक स्तरावर मौल्यवान धातूला असलेली कमी मागणी यामागील कारण राहण्याचे सांगितले जाते. निती आयोगाद्वारे भारताच्या सोने उद्योगाबद्दल काही प्रोत्साहनपूरक पावले उचलले जाण्याच्या दिशेने विचार सुरू असल्याचे सांगितले जाते.