नवी दिल्ली : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत भारताची सोने आयात ३ टक्क्य़ांनी घसरून ३२.८ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. परिणामी गेल्या वर्षी वित्तीय तूट कमी होण्याचा दिलासा सरकारला मिळण्याची शक्यता आहे.

आधीच्या, २०१७-१८ या एकूण वित्त वर्षांत सोन्याची आयात ३३.७ अब्ज डॉलर झाली होती. मौल्यवान धातूच्या दरातील जागतिक स्तरावरील बदलामुळे यंदा भारतीयांकडून सोने मागणी रोडावल्याचे मानले जाते.

सोने क्षेत्रात फेब्रुवारी २०१९ मध्ये नकारात्मक प्रवास नोंदला गेला होता. तर मार्च २०१९ मध्ये त्यात ३१.२२ टक्के वाढ होत आयात ३.२७ अब्ज डॉलर झाली होती. जागतिक स्तरावर सोन्याकरिता भारताची बाजारपेठ मोठी मानली जाते.

कमी आयातीमुळे देशातील मौल्यवान धातू व त्यांच्या दागिन्यांसाठी निर्यातीकरिता मोठी मागणी नोंदली जाते. गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात निर्यात अवघ्या ०.३७ टक्क्य़ांनी घसरत ३.४२ अब्ज डॉलर झाली होती.

भारताची विदेशी चलनातील ओघ व ओहोटीच्या रुपातील व्यापार तूट गेल्या वित्त वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात २.५ टक्के नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती २.१ टक्के होती. वाढत्या वित्तीय तुटीकरिता चिंताजनक असलेल्या सोन्याची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचे उपाय म्हणून मौल्यवान धातूवर १० टक्के शुल्क लावण्यात आले होते.