सरकारची डोकेदुखी बनलेली चालू खात्यातील तूट अधिक चिंताजनक टप्प्यावर पोहोचली आहे. एप्रिल ते जून या विद्यमान आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ही तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.९ टक्के राहिली आहे. अमेरिकन चलनात ही रक्कम २१.८० अब्ज डॉलर आहे. आधीच्या तिमाहीत ही तूट १८.१७ अब्ज डॉलर म्हणजेच उत्पादनाच्या ३.६ टक्के होती, तर वर्षांपूर्वी पहिल्या तिमाहीत ती ४ टक्के होती. रकमेत ती १६.९ अब्ज डॉलर इतकी होती.
सरलेल्या २०१२-१३ या संपूर्ण आर्थिक वर्षांत चालू खात्यातील तुटीने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.८ टक्के प्रमाण राखतानाच ऐतिहासिक उच्चांकाची नोंद केली होती. काळे सोने म्हणजे कच्चे तेल तसेच पिवळ्या सोन्याच्या वाढत्या आयातीने तुटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
एप्रिल ते जून महिन्यांत तेल आयात वार्षिक तुलनेत ३९.४ अब्ज डॉलरवरून वधारून ४२ अब्ज डॉलर झाली, तर सोने आयात वाढून ७.३ अब्ज डॉलर झाली आहे. केवळ याच तिमाहीत नव्हे, तर जानेवारी २०१३ पासून सोने-चांदीच्या वाढत्या आयातीवर र्निबध लादूनही या मौल्यवान धातूंची आयात वाढलेलीच आहे.
तुलनेत निर्यात क्षेत्राने एप्रिल ते जून २०१३ दरम्यान १.५ टक्के घट म्हणजे ७३.९ अब्ज डॉलरची नकारात्मक कामगिरी बजावली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत निर्यात मोठय़ा प्रमाणात, ४.८ टक्के (७५ अब्ज डॉलर) घसरली होती. यंदा आयातदेखील ४.७ टक्क्यांनी वाढून १२४.४ अब्ज डॉलर झाली आहे. तिमाहीतील पहिल्या दोन महिन्यांमध्ये मौल्यवान धातूच्या वाढत्या मागणीने ती वाढली आहे. वर्षभरापूर्वी ती समाधानकारक अशी ३.९ टक्के कमी झाली होती.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या आकडेवारीत पहिल्या तिमाहीत थेट विदेशी गुंतवणूक, देशाबाहेर निधी उभारणी ही २०.८ अब्ज डॉलर अशी जमेच्या बाजूने आहे.  आधीच्या तिमाहीतील १७.८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे, तर अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून होणारी देशाची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत २५.७ अब्जने घसरून जून २०१३ अखेर तिमाहीत ७३१.५ अब्ज डॉलर अशी आहे.
व्यापार तूटही विस्तारली
चालू खात्याबरोबरच व्यापार तूट विस्ताराची आकडेवारीही सोमवारी जारी झाली. यानुसार, चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत व्यापार तूटही वर्षभरापूर्वीच्या ४३.८ अब्ज डॉलरवरून ५०.५ अब्ज डॉलपर्यंत वाढली आहे.
पायाभूत क्षेत्राची वाढ ३.७%
ऑगस्टमधील प्रमुख आठ पायाभूत सेवा क्षेत्रांची वाढ ३.७ टक्के राहिली आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये ती दुप्पट, ६.१ टक्के होती. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा आलेख समजले जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रात या क्षेत्राचा हिस्सा ३४ टक्के असतो. यंदाच्या ऑगस्टमध्ये विद्युतनिर्मिती, सिमेंट, खते यांच्यात वाढ झाली आहे. तर नैसर्गिक वायू, कच्चे तेल यांनी नकारात्मक कामगिरी बजाविली आहे. कोळसा, शुद्धीकरण केलेली उत्पादने यांच्यात वर्षभरापूर्वीपेक्षा यंदाच्या ऑगस्टमध्ये घट झाली आहे.
वित्तीय तूट ७४.६ %
एप्रिल ते ऑगस्ट या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या पाच महिन्यांत वित्तीय तूट अर्थसंकल्पाच्या ७४.६ टक्क्यांना स्पर्श करती झाली आहे. सरकारला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यातील प्रमाण असलेली ही तूट या पाच महिन्यांत ४.०४ लाख कोटी रुपये झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांतील याच कालावधीत ती अर्थसंकल्पाच्या ६५.७ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती, तर २०१२-१३ या एकूण वर्षांत ती सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.९ टक्के अशी कमी झाली होती.
सरकारच्या तिजोरीवर भार ठरणारी वित्तीय तूट कमी करण्यासाठी २०१३ च्या अर्थसंकल्पात त्याचे उद्दिष्ट आर्थिक वर्षअखेर ४.८ टक्के असेही निश्चित करण्यात आले, तर पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी येत्या दोन वर्षांत तुटीचे प्रमाण उत्पन्न दराच्या ३ टक्क्यांच्याही खाली यायला हवे, असे मत मांडले आहे.
सप्टेंबर पावला..
सेन्सेक्सने आणि चलन बाजारात रुपयानेही सप्टेंबर महिन्याची अखेर जबर घसरणीने केली असली तरी, इतिहासावर नजर मारली तर कायम नरमाईचा राहणारा महिना दोहोंसाठी तुलनेने उपकारक ठरला आहे. ऑगस्टअखेरचा सेन्सेक्सचा स्तर पाहता सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्समध्ये ७६०.०५ अंशांची (सुमारे ४.०८%) भर पडली. नोव्हेंबर २०१२ नंतर म्हणजे १० महिन्यांनंतर उत्तम कमाईचा महिना सेन्सेक्सने अनुभवला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सेन्सेक्सने ८३४.५२ अंशांची (४.५१%) मासिक कमाई केली होती.
बरोबरीने सोमवारी रुपया प्रति डॉलर ६२.६१ वर स्थिरावला. शुक्रवारचा रुपयाचा ६२.५२ हा डॉलरमागील स्तर पाहता त्यात ९ पैशांनी घसरण झाली. तथापि ६३.०३ या दिवसातील उच्चांकी पातळीवरून तो सावरला. तथापि सप्टेंबर महिन्यात रुपया तब्बल ५ टक्क्य़ांनी सशक्त झाला. प्रति डॉलर सलग चार महिने अवमूल्यनाचा नवनवीन स्तर दाखविणाऱ्या रुपयासाठी सरलेला सप्टेंबर खरेच पावला!