जागतिक स्तरावर मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर

मुंबई : स्थानिक भांडवली बाजारात पडझड आणि जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता यामुळे शाश्वत मूल्य असलेल्या सोन्याकडील गुंतवणुकीकडे कल जगभरात सर्वत्र वाढला असून, भारतातही सरलेल्या एप्रिल-जून २०१९ तिमाहीत सोने मागणी १३ टक्के वाढून २१३.२ टनांवर गेली आहे. एप्रिल-मेमध्ये नरमलेल्या सोन्याच्या किमतीनेही मागणीला हातभार लावला आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या तिमाहीतील मागणीचा प्रवाह दर्शविणाऱ्या अहवालानुसार, एप्रिल-जून २०१८ मध्ये देशातील सोन्याच्या मागणीचे प्रमाण १८९.२ टन इतके होते. त्यात यंदा १२ टक्क्य़ांची वाढ झाली आहे.

तथापि, किमतीच्या अंगाने पाहिल्यास सोनेखरेदीवर तिमाहीत केला गेलेला खर्च २०१८ मधील ५३,२६० कोटी रुपयांवरून यंदाच्या जूनअखेर ६२,४२२ कोटी रुपयांवर, म्हणजे १७ टक्क्य़ांनी वाढला आहे.

मध्यवर्ती बँकांची खरेदी २२४.४ टनांवर

जून तिमाहीत जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढून १,१२३ टन झाली असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ही वाढ ८ टक्के आहे. मध्यवर्ती बँकेकडून सातत्याने होणारी खरेदी आणि सोने आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) सातत्याने सुरू असलेला गुंतवणूक ओघ हे मागणीतील वाढीचे दोन मुख्य घटक आहेत. या वर्षी जानेवारी ते जून सहामाहीत सोन्याची मागणी २,१८१.७ टनापर्यंत वाढली असून गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत ही वाढ ८ टक्के इतकी आहे. मध्यवर्ती बँकांनी जून तिमाहीत २२४.४ टन सोनेखरेदी केली आहे. तर सोनेआधारित ईटीएफ धारणेत ६७.२ टनांनी वाढ होऊन ती २,५४८ टन अशा सहा वर्षांच्या या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.

एप्रिल आणि मे महिन्यांत गुढीपाडवा, अक्षय्य तृतीयेसारख्या खरेदीचे मुहूर्त असून, सोन्याच्या किमती नरमलेल्या राहिल्या. याचा ग्राहकांच्या मागणीवर सकारात्मक परिणाम दिसून, एकूण मागणी १३ टक्क्य़ांची दमदार वाढ दिसून आली.

सोमसुंदर पीआर,  व्यवस्थापकीय संचालक, डब्ल्यूजीसी