सराफांचा ४२ दिवसांच्या बंदचा परिणाम

आंदोलन सरकारी तिजोरीच्या पथ्यावर

उत्पादन शुल्कविरोधात सलग दोन महिने चाललेले सराफ आंदोलन सरकारच्या पथ्यावर पडले आहे. सरकारी तिजोरीवर भार पडणारी सोने आयात एप्रिल २०१६ मध्ये तब्बल ६७.३३ टक्क्यांनी घसरली आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात ती १९.६ टन नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, एप्रिल २०१५ मध्ये भारताने ६० टन सोने आयात केली होती. भारत हा वर्षांला साधारणत: १,००० टन सोने आयात करणारा चीननंतरचा जगातील दुसरा देश आहे.

सरकारने १ मार्च २०१६ पासून चांदीव्यतिरिक्त अन्य मौल्यवान धातूंवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू केल्याने याविरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी बंद आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत सुरू होते. याउपरही सरकारने शुल्क मागे घेण्यास नकार दिला. किंबहुना सराफांना उत्पादन शुल्काबाबतचा ससेमिरा लागणार नाही, याची ग्वाही देण्यात आली. तत्पूर्वी जानेवारी २०१६ पासून सराफांना २ लाख रुपयांवरील दागिन्यांच्या व्यवहारादरम्यान पॅन कार्ड सक्तीही करण्यात आली.

यानंतरही एप्रिलअखेरच्या टप्प्यात तीन दिवस बंद पुकारण्यात आला होता. विविध नऊहून अधिक सराफ संघटना, सराफ विक्रेते, सराफ दालने तसेच हजारो सुवर्णकार या आंदोलनात सहभागी झाले होते. एप्रिलमधील गुढीपाडव्यानंतर बंद संपुष्टात येण्यापूर्वी दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये सराफ दालने सुरू ठेवण्यात आली होती.

जानेवारी २०१६ पासून सोने आयातीतील घसरण सुरू आहे. रकमेमध्ये डिसेंबर २०१५ मधील ३.८० अब्ज डॉलरवरून ती मार्च २०१६ पर्यंत ०.९७ अब्ज डॉलरवर आली होती. गेल्या आर्थिक वर्षांत भारतात ७५० टन सोने आयात केले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षांत हे प्रमाण ९७१ टन होते. २०१५-१६ मध्ये रकमेमध्ये जवळपास ५ टन अशी सर्वाधिक सोने आयात नोंद मार्च व ऑगस्टमध्ये नोंदली गेली आहे.