सरलेल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारतातील करोना साथीला प्रतिबंध सुरू राहिलेल्या टाळेबंदीमुळे सोन्याची मागणी तब्बल ७० टक्क्यांनी घटून केवळ ६३.७ टक्क्यांवर घसरली आहे. मात्र मागील सहा महिन्यांत दागिने व प्रत्यक्ष धातूंमधील गुंतवणुकीपेक्षा, सोन्यावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ईटीएफमधील गुंतवणूक तब्बल ७५ टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत तीव्र स्वरूपाच्या तेजीमुळे, एकीकडे दीर्घावधीची गुंतवणूक म्हणून सोन्यातील ईटीएफसारख्या गुंतवणुकीकडे पैशाचा ओघ वाढला आहे, तर त्याच वेळी सोने धातू (वळी, विटा या रूपात) तसेच दागिने घडविण्यासाठी मागणी कमालीची घटली आहे, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या ‘गोल्ड डिमांड ट्रेण्ड्स’ अहवालाने दाखवून दिले आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०२० मध्ये झालेल्या १९५ कोटी रुपयांच्या निर्गुतवणुकीचा अपवाद केल्यास, जानेवारी ते जून दरम्यान ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये निरंतर गुंतवणूक ओघ राहिला असून, फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक १,४८३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. जूनअखेर गोल्ड ईटीएफमधील एकूण मालमत्ता गेल्या वर्षांच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी वाढून, १०,८५७ कोटी रुपयांवर गेली आहे.

जागतिक स्तरावरही सोन्याची एकूण मागणी घटली असली तरी पहिल्या सहामाहीत सोनेआधारित ईटीएफमध्ये विक्रमी ७३४ टनांची वृद्धी दिसून आली. जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँका आणि सरकारांनी करोना संकटाला प्रतिसाद देताना व्याजदरात कपात आणि अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणावर तरलतेची तरतूद करणे यांसारखी पावले उचलल्याने ही विक्रमी आवक शक्य झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे अनुमान आहे.

मागणी २६ वर्षांचा नीचांक गाठेल

भारतात सोन्याच्या दागिन्यांसाठी एकूण मागणी एप्रिल-जून तिमाहीत ७४ टक्क्यांनी घटून अवघी ४४ टन इतकीच दिसून आली. गतवर्षी याच तिमाहीत ही मागणी १६८.६ टन इतकी होती. जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या भारतात २०२० सालातील सोन्याची मागणी २६ वर्षांपूर्वी मागे सोडलेल्या नीचांकाला गाठणारी असेल, असाही वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा कयास आहे. टाळेबंदीमुळे लक्षावधींनी गमावलेल्या नोकऱ्या, भविष्याबाबत अनिश्चितता,  तसेच अस्मान गाठलेल्या किमतीचा मागणीला फटका बसेल.

*  पुरवठय़ावरही परिणाम

जागतिक करोना साथीचा परिणाम सोन्याच्या पुरवठय़ावरही झाला आहे. पहिल्या सहामाहीतील एकूण पुरवठा सहा टक्क्यांनी घटून २१९२ टनांवर आला. टाळेबंदी आणि उत्पादन निर्बंधांमुळे खाणकाम आणि पुनर्वापर अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांवर परिणाम झाल्याने ही घट झाली आहे.