उच्च आयात शुल्क आणि आयातीवरील विविध र्निबधांचा फेरविचाराची मोदी सरकारकडून अपेक्षा असतानाही, प्रत्यक्षात वर्षांपूर्वी तात्पुरत्या अनुसरल्या गेलेल्या धोरणालाच कायम रूप दिले जाईल, अशी सराफ उद्योगाकडून चिंता व्यक्त होत आहे. उद्योगासमोरील आव्हानांची चर्चा पुण्यात १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांच्या परिषदेत होणार असून, त्यानंतर सामूहिक कृती-कार्यक्रम आखला जाणार आहे.
सराफ उद्योगावरील र्निबधाचा परिणाम म्हणून जगातील सोन्याचा दुसरा मोठा आयातदार असलेल्या भारतात सोने आयात २०१४ च्या पहिल्या सहामाहीत ४३ टक्क्य़ांनी घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून चालू खात्यातील तूटही अनेक वर्षांनंतर प्रथमच जून २०१४ तिमाहीअखेर दोन टक्क्य़ांखाली उतरली आहे. तथापि ऑगस्ट २०१३ मधील गंभीर स्थितीनुरूप सरकारने अल्पावधीसाठी हे सराफ उद्योगाच्या दृष्टीने कठोर धोरण स्वीकारले. परंतु हेच धोरण मध्यम अथवा दीर्घावधीसाठी पुढे रेटणे कदापिही उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया फोरटेल बिझनेस सोल्यूशन्सचे अध्यक्ष जी. श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. फोरटेलनेच पुण्यात ‘इंडिया इंटरनॅशनल गोल्ड कन्व्हेंशन’ नावाने या परिषदेचे आयोजन केले आहे.
देशातील बडे जवाहिर, विक्री शृंखलांचे चालक, निर्यातदार, सोने शुद्धीकरण कंपन्यांचे प्रतिनिधी, विश्लेषक यांच्या सहभागाने होत असलेल्या परिषदेत, देशांतर्गत सोन्याच्या चलनवलनात वाढ हे चर्चेचे केंद्र असेल. भारतात कुटुंबांकडे, मंदिर न्यासांकडे संचयित तब्बल २०,००० टन सोन्याच्या चलनीकरणाची प्रभावी योजना प्रस्तुत करण्याबाबत तरी सरकारने पावले टाकावीत, अशी अपेक्षा श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. या पिढय़ान्पिढय़ा  विनावापर राहिलेल्या सुवर्ण पुंजींचे चलनीकरण म्हणजे त्याच्या हस्तांतरणीय मूल्याची निष्पत्ती होऊन बचतकर्त्यांला लाभ होईल, विदेशातून सोने आयातीची गरज राहणार नाही आणि आज अकस्मात वाढ झालेल्या सोने तस्करीला पायबंद घालण्याचे तिहेरी फायदे असल्याचे त्यांनी सांगितले. वित्तीय क्षेत्राकडून या संदर्भात प्रभावी व लोकप्रिय योजना लवकरात सादर केली जायला हवी, अशी या परिषदेची अपेक्षा आहे.