यंदाच्या हंगामात दागिन्यांच्या मागणी जोरावर साठवणूकदारांनी पिवळ्या धातूची खरेदी करून ठेवल्याने मंगळवारी सोन्याच्या दराने गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम भाव नोंदविला. तोळ्यासाठी सोन्याचे भाव आता २८ हजारानजीक पोहोचले आहेत.
स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याचे दर मंगळवारी १० ग्रॅममागे एकदम १९० रुपयांनी वाढले. परिणामी धातूला तोळ्यासाठी २७,९४० रुपयांचा भाव मिळाला. सोमवारच्या २७,७५० रुपयांच्या तुलनेत सोने आता २८ हजाराच्या उंबरठय़ावर आहे, तर शुद्ध सोने दराने हा टप्पा ओलांडलाच. या प्रकारचा धातू मंगळवारी १९० रुपयांनी उंचावून २८ हजार रुपयांपल्याड पोहोचला. चांदीच्या दरानेही मंगळवारी किलोसाठी जवळपास ४० हजार रुपयांचा दर प्राप्त केला. पांढऱ्या धातू दरांमध्ये किलोमागे एकदम ३१० रुपयांची भर पडल्याने चांदी आता ४० हजारानजीक, ३९,७६० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
रुपयातही तेजी
शेअर बाजाराप्रमाणे रुपयानेही सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदविली. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी २ पैशांनी वधारला असला तरी तो आता ६१.६९ पर्यंत उंचावला आहे. भांडवली बाजारातील तेजीतील व्यवहारात गुंतवणूकदारांना स्थानिक चलनाची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासल्याने त्यांनी अमेरिकी डॉलरच्या विक्रीचे धोरण अवलंबिले. गेल्या चार व्यवहारांतील रुपयाची भक्कमता ही ४९ पैशांची राहिली आहे.