स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे आणि चांदीचे भाव गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या भावांनी प्रति १० ग्रॅम ४०,००० रुपयांच्या नजीकची पातळी गाठली आहे. तर सोन्याचेच अनुकरण करत चांदीचा भावही प्रति किलो ५०,००० रुपयांच्या पुढे गेला आहे.

जागतिक तसेच स्थानिक बाजारातील विविध कारणांमुळे सोने व चांदी उच्चांक गाठत असले तरी भारतीय रुपयाची घसरणही यासाठी मुख्यत: कारणीभूत आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ७२.२५ या वर्षभरातील नीचांकी पातळीवर असून त्यामुळेही मौल्यवान धातू महागले आहेत. या धातुंची खरेदी विक्री आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये होत असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यावर भारतामध्ये हे धातू महाग होतात. परिणामी सोनं प्रति १० ग्रॅम ४०,००० रुपयाजवळ तर चांदी प्रति किलो ५०,००० रुपयापार झाली आहे.

अमेरिकेमध्ये उत्पादन घसरत असून सध्या ते तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अमेरिकी शिखर बँक व्याजदरांमध्ये कपात करण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अमेरिका चीनदरम्यानचं व्यापार युद्ध, ब्रेग्झिटचे दुष्परिणाम तसेच हाँगकाँगमधली तणावाची स्थिती आदी कारणांमुळेही जागतिक बाजारात मंदीचे वातावरण आहे, ज्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांचा मोर्चा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीकडे वळत आहे. त्यामुळे या धातुंच्या किमतीत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तर स्थानिक म्हणजे भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर गेली तीन वर्षे सोने व चांदीच्या किमती वाढत आहेत, परिणामी मागणी मंदावली असून आयातही घटली आहे. सध्या भारताची मौल्यवान धातुंची आयात तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे आता यापुढे सोन्या चांदीच्या किंमती फार वधारणार नाहीत असाही अंदाज व्यक्त होत आहे.