मुंबई : सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या करोनाग्रस्त चीन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेल, डॉलरच्या उसळीचा लक्षणीय विपरित परिणाम भारतावर होण्यास सुरुवात झाली आहे. सोन्याच्या किमती तोळ्यांमागे ४२ हजार रुपयांनजीक गेल्याने त्याची पहिली झलक दिसली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मौल्यवान धातूच्या दरांतील ही महागाई अनुभवली जात आहे.

देशात आर्थिक मंदीसदृश परिस्थिती आणि तुलनेत लग्नादी समारंभाची रेलचेल कमी असताना सोन्याच्या वाढत्या किमतीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. खुद्द सराफा बाजार त्याची कारणमीमांसा करत असून, कमी कालावधीत होत असलेल्या मोठय़ा उसळीने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत स्टॅण्डर्ड सोने गुरुवारी तोळ्यामागे ४१,५७५ रुपयांपर्यंत पोहोचले. त्यात एकाच व्यवहारात १०५ रुपयांची भर पडली. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही सोन्याच्या दराची उसळी कायम असून १० ग्रॅमसाठी सोन्याचे दर ४२,५०० रुपयांपुढे राहिले. दोन्ही महानगरांमध्ये गेल्या काही सलग व्यवहारांपासून मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ होत आहे. तुलनेत मुंबई तसेच दिल्लीत चांदीच्या किमतीमध्ये मात्र (पान ११ वर) (पान १ वरून) उतार दिसला. डॉलर हे अमेरिकी परकीय चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत ७२ पर्यंत पोहोचले आहे. खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप ६० डॉलपर्यंत पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात २०२० च्या पहिल्या दोन महिन्यांतच सोन्याचे दर ६ टक्क्य़ांनी वाढले आहेत. परिणामी, येथेही त्यातील दरचकाकी नोंदली जात आहे. स्थानिकपेक्षा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा धसका सराफा बाजाराने घेतला असून मौल्यवान धातूच्या दरातील दिवसागणिकची मूल्यउसळी हा सट्टेबाजीचा प्रकार असल्याचे सराफा व्यावसायिक नमूद करतात.