अमेरिकन चलनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती अधिक मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी पडझड झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठांमध्येही दिसून येत आहे. भारतामध्ये सोनाचा दर प्रती तोळा ६७२ रुपयांनी घसरला आहे. तर दिल्लीमधील सराफा बाजारामध्ये एक किलो चांदीची किंमत एका दिवसात पाच हजार ७८१ रुपयांनी कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते परदेशी बाजारांमधील सोन्याचे दर तीन टक्क्यांहून अधिक गडगडले असून एक महिन्याच्या सर्वात किमान पातळीवर आले आहेत. भविष्यातही सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये ९९. टक्के शुद्ध सोन्याची किंमत ६७२ रुपयांनी कमी होऊन ५१ हजार ३२८ रुपये प्रति तोळ्यापर्यंत आली आहे. सोमवारी हा दर ५२ हजार रुपये प्रति तोळा इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्येही सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे दर १९०० डॉलर प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) पर्यंत खाली आले आहेत.

सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी एक किलो चांगीचा दर पाच हजार ७८१ ची घसरुन प्रति किलो ६१ हजार ६०६ रुपयांपर्यंत आला. सोमवारी हा दर ६७ हजार ३८७ रुपये प्रति किलो इतका होता.

नक्की पाहा >> या दहा देशांकडे आहे जगातील सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील बाजारपेठेत आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ६७२ रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे हे निर्देश आहेत असंही तपन म्हणाले. करोनाची दुसरी लाट येऊ शकते या भितीने गुंतवणुकदारांनी आता डॉलरमध्ये सुरक्षित गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच अमेरिकन चलन अधिक मजबूत होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीन घसरण होऊ शकते.