चढय़ा दराच्या सोने-चांदीतील गुंतवणुकीतून घसघशीत लाभ; तुलनेत २०१६ मध्ये सेन्सेक्सची मात्र एक अंकी टक्केवारीतील वाढ
सणांचा मोसम सुरू होत असताना मौल्यवान धातूंनी दाखविलेल्या दरचकाकीने भांडवली बाजाराचेही डोळे दिपले आहेत. अनोख्या टप्प्यावर गेलेल्या दरांची नोंद करणाऱ्या सोने – चांदीने २०१६ मध्ये आतापर्यंत गुंतवणूकदारांना ४१ टक्के परतावा दिला आहे. तुलनेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा परतावा हा अवघा ७.७९ टक्केच राहिला आहे.
२०१६ मध्ये सोन्याच्या किंमती २२.२९ टक्के तर चांदीचे दर ४०.६९ टक्क्य़ांनी उंचावले आहेत. सध्या तोळ्यासाठी सोन्याचा दर ३१ हजार रुपयांपुढे तर चांदीचा किलोचा भाव ५० हजार रुपयांनजीक आहे.
२५,३९० रुपये असलेले डिसेंबर २०१५ अखेर सोन्याचे दर (१० ग्रॅमकरिता) गेल्या आठवडाअखेर (नवी दिल्लीत) ३१,०५० रुपयांवर पोहोचले. तर चांदीचा दरही सात महिन्यांपूर्वीच्या किलोसाठीच्या ३३,३०० रुपयांवरून ४६,८५० रुपयांवर गेले.
गेल्या एकूण १५ पैकी १२ वर्षांमध्ये सोन्याने सकारात्मक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. २०१५ मध्ये मात्र सोने तसेच समभागातील परतावा हा उणेच नोंदला गेला आहे. मौल्यवान धातूंच्या तुलनेत भांडवली बाजाराने २०१४ मध्ये सलग तिसऱ्या वर्षांत गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळवून दिला आहे.
सेन्सेक्सचा परतावा अवघा ८ टक्केच!
२०१६ मध्ये सेन्सेक्स ९ ऑगस्ट रोजी (गेल्याच आठवडय़ात) २८,२८९.९६ या वर्षभराच्या टप्प्यावर पोहोचला होता. मुंबई निर्देशांकाने त्याचा ३०,०२४.७४ हा ऐतिहासिक स्तर ४ मार्च २०१५ रोजी गाठला होता. त्यापासून प्रमुख निर्देशांक अद्यापही १,८७२.३४ अंश म्हणजेच ६.२३ टक्के दूर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलादी जिन्नसांच्या व देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थानिक चलनातील अस्थिरता यामुळे भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा रस काहीसा कमी झाला. मार्च २०१६ पर्यंत बाजाराची अशीच काहीशी स्थिती असताना सेन्सेक्ससह निफ्टीने यानंतर काहीशी उसळी नोंदविली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह कंपन्यांचे चालू आर्थिक वर्षांतील सुमार वित्तीय निष्कर्षांच्या पाश्र्वभूमीवर बाजारातील पडझडीची भीती कायम असतानाच वस्तू व कर विधेयकाच्या रुपाने आर्थिक सुधारणा तसेच दमदार मान्सूनच्या जोरावर भांडवली बाजारामध्ये पुन्हा एकदा ऊर्जितावस्था निर्माण झाली आहे.