साखरेच्या आयात शुल्कातील वाढ १५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत व पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर पाच टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्यामुळे ऊस उत्पादकांना आता उसाचा भाव ३०० रुपये वाढवून देणे शक्य असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन दृष्टिपथात आहेत.
नॅचरल शुगर कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असून ग्राहकांना साखरेचा भाव केवळ दोन रुपये किलोमागे अधिक द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. देशांतर्गत साखरेचा साठा मोठय़ा प्रमाणावर शिल्लक आहे त्यात विदेशातून साखरही बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे गतवर्षी साखर उद्योग आíथक अडचणीत आला.
विदेशातून येणाऱ्या साखरेवर आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविल्यामुळे देशांतर्गत साखरेला उठाव मिळेल. शासनाने घाऊक व किरकोळ साखर विक्रेत्यातील नफा कमी केला असल्यामुळे ग्राहकांना या निर्णयामुळे जास्त पसे द्यावे लागणार नाहीत. मात्र शेतकऱ्यांना टनामागे किमान १०० रुपये अधिक मिळतील.
लोकमंगल उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, आयात शुल्कात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना उसाला अधिक भाव देण्यास आधार मिळेल, असे सांगितले.
राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही केंद्र सरकारच्या दोन्ही निर्णयांचे स्वागत केले आहे. पाटील म्हणाले, ‘‘विदेशी साखरेवरील आयात शुल्क ६० टक्के केले जावे व इथेनॉलचा वापर २० टक्के करावा, अशी आपली मागणी होती. शासनाने आमच्या मागणीपेक्षा कमी टक्क्याचा निर्णय घेतला असला तरी तो शेतकरी हिताचाच आहे.’’
पुण्याच्या अलसुक्रोज कार्पोरेशनचे विजय गिरासे यांनी इथेनॉलचा वापर वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी पेट्रोलियम कंपन्यांकडे इथेनॉल साठवण्याची सध्या यंत्रणा नाही असे सांगितले. शासनाने निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी करताना जी यंत्रणा उभी करावी लागते ती तातडीने उभारण्याबद्दलचे गांभीर्य दाखवले जात नाही. या निर्णयामुळे स्थानिक रोजगार वाढेल, असे त्यांनी सांगितले.
कागल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह घाटगे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करतानाच, अंमलबजावणी किती परिणामकारकरीत्या होते यावर या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
पेट्रोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयाने तेल आयातीवरील १२ हजार कोटी वाचतील!
पेट्रोलमध्ये इथेनॉल पाच टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत अधिक मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे वर्षांला १२ हजार कोटी रुपये देशाचे वाचतील. इराकमधील सद्य:स्थितीचा परिणाम या निर्णयामुळे आपल्याला जाणवणार नाही. शिवाय हा निर्णय घेतल्यामुळे उसाला प्रतिटन २०० रुपये अधिक भाव साखर कारखान्यांना देणे शक्य होईल.