आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला सरकारनं अधिसुचित केलं असून खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेवर लावण्यात आलेले निर्बंध पुढील तीन दिवसात हटवण्यात येणार आहेत. पुढील तीन कामकाजांच्या दिवसात खात्यांवर लावण्यात आलेले निर्बंध काढण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सध्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले असून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत आहेत.

ही पुनर्बांधणी योजना लागू होण्याच्या तारेखपासून पुढील तीन दिवसांमध्ये येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येतील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी येस बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकींग, यूपीआय पेमेंट आणि एटीएममधून पैसे काढण्यासही समस्यांचा सामना करावा लागला होता. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत सरकारनं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे.

“केंद्रीय मंत्रिमंडळानं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे. भारतीय स्टेट बँक येस बँकेतील ४९ टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करणार आहे. या अधिसुचनेच्या सात दिवसांच्या आत संचालक मंडळही स्थापन करण्यात येणार आहे,” अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक सरसावल्या
खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक या दोन बँका येस बँकेत गुंतवणुकीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दोन्ही बँकांनी प्रत्येकी १ हजार कोटी रूपये गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे आयसीआयसीआय बँकेचा पाच टक्क्यांपेक्षा अधिक इक्विटी हिस्सा होणार आहे. तर अॅक्सिस बँकही ६० कोटी रूपयांचे शेअर खरेदी करण्यासाठी ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तर कोटक मंहिंद्रा बँकेनंही येस बँकेत ६०० कोटी रूपये गुंतवण्याची घोषणा केली आहे.