मुंबई : विविध मालमत्ता वर्गाची कामगिरी आर्थिक परिस्थिती पाहून आणि विविध बाजार चक्रात वेगवेगळी असल्याने विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायात मालमत्ता विभाजित करून एक यशस्वी पोर्टफोलिओ तयार करणे हे प्रत्येक गुंतवणूकदाराने टाकावयाचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. असे सुयोग्य मालमत्ता बाजार अस्थिरतेतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊन जाते, असे विश्लेषकांचे मत आहे.

म्युच्युअल फंडांतील डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड गुंतवणूक वैविध्य प्रदान करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. नुकसान कमीत कमी राहील अशी नियमित तज्ज्ञ देखरेखीसह, जोखीमसंतुलित परतावा अशी गेल्या काही वर्षांत डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडाची वैशिष्टय़े राहिली आहेत.

गेल्या पाच वर्षांत या फंडांचा सरासरी परतावा १४ टक्के, तर सात वर्षांत १३.१ टक्के, तर त्याच वेळी ‘निफ्टी-५० टीआरआय’ या संदर्भ निर्देशांकाने पाच आणि सात वर्षांत अनुक्रमे ०.४ टक्के आणि ०.९ टक्के तर ‘क्रिसिल हायब्रीड ५०-५० मॉडरेट’ निर्देशांकाने अनुक्रमे १.६ टक्के आणि २ टक्के परतावा दिला आहे. या श्रेणीतील आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अ‍ॅसेट अ‍ॅलोकेटर फंडाने रोखे आणि समभाग गुंतवणुकीमध्ये समतोल साधून चांगली कामगिरी केली आहे. एस. नरेन आणि धर्मेश काकड रोखे बाजारातील दांडगा अनुभव असलेल्या निधी व्यवस्थापकांकडून फंडाचे व्यवस्थापन केले जाते. २०१२ नंतर या फंडाने केवळ सकारात्मक परतावा दिला आहे. तर याच कालावधीत भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी अस्थिरेतून काही वेळा नकारात्मक परतावा दिला.

मुंबईस्थित सजग सिक्युरिटीज प्रा. लि.चे संस्थापक गणेशप्रसाद प्रधान यांनीही ही बाब समजावून देताना, डायनॅमिक अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन धाटणीच्या गुंतवणूक पद्धतीचे महत्त्व सांगितले आहे. यांच्या मते, गुंतवणूक पर्याय बदलते ठेवणारे फंड गुंतवणूकदारांना चार तऱ्हांनी फायद्याचे असतात. पहिले म्हणजे वैविध्यपूर्ण गुंतवणूक, दुसरे म्हणजे गुंतवणुकीचा नियमित आढावा आणि नक्त मालमत्ता मूल्यातील वाढ ही घसरणीपेक्षा जास्त असेल याची खबरदारी, तिसरे जोखमीचा विचार करता शक्य तेवढा जास्त फायदा आणि चौथे म्हणजे कर आणि चलनवाढ यांचा अंतर्भाव करून मिळणारा कमाल परतावा – जो इतर गुंतवणूक पर्याय देत नाहीत.

या प्रकारचे फंड हे भावना बाजूला ठेवून ‘भाव उतरले की खरेदी आणि वाढले की विक्री’ या तत्त्वानुसार शिस्तबद्ध गुंतवणूक करतात आणि बाजारातील चढ-उताराला यशस्वीपणे तोंड देतात.