इन्फोसिसने यंदाच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या हंगामाचा प्रारंभ काहीसा निराशाजनक केल्यानंतर देशातील अव्वल स्थानावरील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने मात्र भरघोस २२ टक्क्यांची निव्वळ नफ्यातील वाढ नोंदविली आहे. टाटा समूहातील या कंपनीने जानेवारी ते मार्च २०१३ या तिमाहीत ३,५९६.९० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, तर चौथ्या क्रमांकावरील एचसीएल टेक्नॉलॉजीजनेही नफ्यात थेट ७२.६ टक्के वाढीची मजल मारली आहे. याच क्षेत्रातील अझीम प्रेमजी यांच्या विप्रोच्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या कामगिरीवर आता गुंतवणूकदारांची नजर असेल.
सुमारे १०२ अब्ज डॉलरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिसने गेल्या शुक्रवारी नफ्यातील किरकोळ घसरणीसह आगामी वाटचालीबाबत चिंता निर्माण केली होती. यामुळे कंपनीचे समभाग मूल्यही मुंबई शेअर बाजारावर चांगलेच आपटले होते. तर गेल्या आर्थिक वर्षांत १० अब्ज डॉलरच्या उलाढालीचा अनोखा टप्पा पार करणाऱ्या टीसीएसने बुधवारी २३.९ टक्के वाढीव महसुलीचे गेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. समूहाच्या परंपरेत बसत नसल्यामुळे कंपनीने आगामी व्यवसायाचे चित्र रेखाटलेले नाही. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांनी केवळ, नवे आर्थिक वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक संधी मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला.
नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एचसीएलनेही जानेवारी ते मार्च या तिमाहीत १,०३९.९० कोटी रुपये निव्वळ नफा कमाविला आहे. कंपनीच्या लेखी जुलै ते जून असे आर्थिक वर्ष असल्याने हा त्यांचा आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीचा निकाल होता. दरम्यान, विप्रो कंपनीचे तिमाही निकाल येत्या शुक्रवारी जाहीर होत आहे. याच तिमाहीत समूहातील कंपन्यांची पुनर्रचना झाल्याने गुंतवणूकदारांचेही यंदाच्या निष्कर्षांकडे लक्ष आहे.