नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर संकलनाने पुन्हा एकदा एक लाख कोटी रुपयांपासून फारकत घेतली आहे. फेब्रुवारीमधील अप्रत्यक्ष कर संकलन ९७,२४७ कोटी रुपये झाले आहे.

जानेवारी २०१९ मध्ये वस्तू व सेवा करापोटी १.०२ लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता. चालू वित्त वर्षांत तिसऱ्यांदा या टप्प्यापर्यंतची रक्कम जमा झाली आहे.

मात्र फेब्रुवारीमध्ये त्यात काही प्रमाणात घसरण होऊन ही रक्कम एक लाख कोटी रुपयांच्या आत स्थिरावली. पैकी १७,६२६ कोटी रुपये मध्यवर्ती वस्तू व सेवा करापोटी तर २४,१९२ कोटी रुपये राज्य वस्तू व सेवा कराद्वारे जमा झाले आहेत. तर अधिभार म्हणून ८४७६ कोटी रुपये कर संकलन झाले आहे.

वार्षिक तुलनेत यंदा वस्तू व सेवा कर संकलन १३.१२ टक्क्यांनी वाढले आहे. वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्ये ८५,९६२ कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष कर सरकारला मिळाला होता.

अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या यंदा जानेवारीमधील ७३.३० लाखांवरून वाढत ७३.४८ लाख झाली आहे. वस्तू व सेवा कर रचनेतील २३ वस्तू व सेवांवरील कर दर कमी करण्यात आल्याने यंदा कर संकलन कमी झाल्याचे मानण्यात येते. वस्तू व सेवा कर परिषदेने चित्रपट तिकीट, दूरचित्रवाणी आदींवरील कर १ जानेवारीपासून कमी केले होते. तसेच वाहनांचे काही सुटे भाग, टायर, कॅमेरा यावरील कर आधीच्या २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणले होते.

अप्रत्यक्ष कर संकलनाचे मासिक सरासरी १ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य सरकारने राखले होते. यानुसार पहिल्या ११ महिन्यांमध्ये ११ लाख कोटी रुपये जमा होण्याऐवजी एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान १०.७० लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. संपूर्ण वित्त वर्षांसाठीचा अंदाज सरकारने १३.७१ लाख कोट रुपयांवरून कमी केला आहे.

चालू वित्त वर्षांत एप्रिल, ऑक्टोबर व जानेवारी दरम्यान एक लाख कोटी रुपयांहून अधिक अप्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. तर सर्वात कमी वस्तू व सेवा कर ऑगस्टमध्ये जमा झाला आहे.

वार्षिक तुलनेत वाढ..

मासिक जीएसटी संकलनाने अपेक्षित एक लाख कोटींचे प्रमाण गाठले तरी, वार्षिक तुलनेत मात्र ते १३.१२ टक्क्यांनी वाढले आहे. वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्ये या कर संकलनाचे प्रमाण ८५,९६२ कोटी रुपये असे होते.