सर्वाधिक पसंतीचे सर्च इंजिन असलेले गुगल इंडिया हे भारतातील नोकरीसाठी सर्वाधिक आकर्षक ठिकाणही आहे. नियोक्त्यांसंबंधी मत-चाचणी असलेल्या ‘रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्च २०१७’ या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांतून हे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणावर आधारित रँडस्टॅड अवॉर्डच्या सातव्या आवृत्तीची गुगल इंडिया विजेती, तर मर्सिडिझ बेंझ इंडियाने उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला आहे.

अग्रणी मनुष्यबळ सेवा पुरवठादार कंपनी रँडस्टॅडकडून दरवर्षी जागतिक स्तरावर सर्वात मोठय़ा लोकांच्या कंपनीसंबंधी मत अजमावणारे सर्वेक्षण घेतले जाते. भारतातील सर्वेक्षणात विभागीय विशेष विजेत्यांमध्ये आकर्षक नियोक्ते म्हणून ई-कॉमर्स वर्गवारीत अ‍ॅमेझॉन इंडिया, ग्राहकोपयोगी उत्पादन वर्गवारीत आयटीसी लिमिटेड आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स व आरोग्यनिगा विभागासाठी फिलिप्स इंडिया यांनी सर्वश्रेष्ठतेचे मानांकन मिळविले आहे.

आजही भारतात योग्य वेतन आणि कर्मचाऱ्यांसाठीचे लाभ हे निकष नोकरीच्या दृष्टीने प्रामुख्याने विचारात घेतले जातात. यानंतर योग्य नोकरी आणि चांगले जीवनमान यांचा समतोल, नोकरीची सुरक्षितता या गोष्टी पाहिल्या जातात. तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी मात्र योग्य नोकरी, उत्तम काम आणि चांगले जीवनमान यांच्यातील समतोल या गोष्टी प्राधान्यक्रमाने येतात.

आयटीतील नोकरीलाच पसंती

रँडस्टॅडच्या या सर्वेक्षणातून असेही अधोरेखित करण्यात आले की, ६५ टक्के भारतीय कर्मचारी आयटीसारख्या क्षेत्रात काम करू इच्छितात, त्या खालोखाल बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रात, रिटेल आणि ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रांची क्रमवारी लागते. रँडस्टॅड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चने तब्बल ३,५०० विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांचे मते या सर्वेक्षणातून जाणून घेतली आहेत.

महिंद्रा हॉलिडेज बनले कामासाठीचे उत्तम ठिकाण

मुंबई : आदरातिथ्य क्षेत्रातील अग्रणी नाममुद्रा महिंद्रा हॉलिडेजला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ संस्थेतर्फे  कामासाठी सर्वोत्तम ठिकाण असे प्रमाणन बहाल करण्यात आले आहे. मोठय़ा आकारातील संस्था या वर्गवारीत कंपनीने हे मानांकन मिळविले आहे. भारतात आणि भारताबाहेर ४५ रिसॉर्ट्स असलेल्या महिंद्रा हॉलिडेजचे २४०० हून अधिक कर्मचारी संस्थेच्या देशभरातील ३०० पेक्षा जास्त सामाजिक उपक्रमात सहभागी होतात. या सर्वासाठी हे मानांकन विशेष आनंदाची बाब आहे, असे महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कविंदर सिंग यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्वोत्तमता आणि यश या दोन गोष्टी पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ‘अस्सलतेच्या प्रत्येक क्षणां’साठी या ब्रीदाप्रमाणे आमच्या लोकांना सबळ करण्याचे प्रयत्नही आमचा मनुष्यबळ विभाग करीत असतो. आमच्या एकूण कार्य संस्कृतीत आमची मूल्ये आणि संस्था आणि सदस्यांमधील विश्वास व भावनिक गुंतवणूक यांचा समावेश होतो. यातूनच संस्थेची ध्येये पूर्ण करता येतात, यावर आपली ठाम धारणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.