गुगलचे २०१६ मध्ये १०० स्थानकांवर वायफाय
*वायफाय सेवेचा श्रीगणेशा मुंबई सेंट्रल स्थानकापासून
*ग्रामीण भागात इंटरनेट उपलब्धतेसाठी गुगल लुन प्रकल्प
अँड्रॉईड भ्रमणध्वनीधारकांबाबतीत भारत अमेरिकेलाही मागे टाकणार असल्याचे भाकीत वर्तवीत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतातील विस्तारीकरणाबाबतचे महत्त्वाकांक्षी मनसुबे जाहीर केले. भारतात येत्या वर्षांत १०० रेल्वे स्थानकांवर वाय-फाय इंटरनेट जोडणी उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली. इंटरनेटपासून वंचित असणाऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागात फुग्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरविणारा लून प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. वायफाय सेवेचा श्रीगणेशा मुंबई सेंट्रल स्थानकापासून होईल.
भारतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी कंपनी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दोन दिवसांच्या भारतभेटीवर आलेल्या पिचाई यांनी दिली. पुढील वर्षीपर्यंत भारतीय रेल्वेची दूरसंचार क्षेत्रातील उपकंपनी असणाऱ्या ‘रेलटेल’च्या सहकार्याने १०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध केली जाईल. देशातील ४०० रेल्वे स्थानके या सुविधेने सुसज्ज होतील. पिचाई हे राष्ट्रपती व पंतप्रधानांची भेट घेणार असून दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
कंपनीच्या भारतातील विस्तारीकरणाबाबत ते म्हणाले, बंगळुरू व हैदराबाद येथील प्रकल्पांमध्ये कर्मचारीसंख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच, हैदराबाद येथे गुगल संकुल उभारले जाईल. तसेच, तीन लाख खेडय़ांमधील महिलांना इंटरनेटसेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही कंपनी हाती घेत आहे. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भारतीयांना अँड्रॉईड व क्रोम सारखी साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून, २०१६पासून ‘टॅप टू ट्रान्स्लेट’ ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, त्यात अँड्रॉइड फोनवर कुठलाही मजकूर त्वरित भाषांतरित करण्याची सोय असेल. सध्या गुगलने ११ भारतीय भाषांत आभासी कळफलकही (व्हच्र्युअल की बोर्ड) उपलब्ध करून दिला आहे. अँड्रॉईड संगणकप्रणालीचा प्रसार करण्यासाठी पुढील तीन वर्षांत २० लाख नवीन अँड्रॉइड विकासकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सहकार्याने ३० विद्यापीठांशी करार केला जाईल. गुगलच्या प्रयत्नांमुळे २०१८ पर्यंत २९ राज्यांतील ५० कोटी लोक इंटरनेट सेवेचे लाभधारक बनतील.