गुंतवणूकदार संस्थांप्रमाणेच किरकोळ गुंतवणूकदारांकडूनही सार्वजनिक कॉन्कॉरच्या भागविक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे ५ टक्के भागविक्रीच्या प्रक्रियेतून सरकारने १,१६५ कोटी रुपये उभारले. गेल्या पंधरवडय़ातील सरकारची ही दुसरी यशस्वी निर्गुतवणूक मोहीम आहे.
दोन दिवसांच्या कॉन्कॉर समभाग विक्री प्रक्रियेत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या गुरुवारी किरकोळ गुंतवणूकदारांनी १.२६ पट प्रतिसाद नोंदविला. त्यांच्यासाठी १९.४९ लाख समभाग उपलब्ध करून दिले असताना २४.५९ लाख समभागांकरिता मागणी नोंदविली गेली. २ टक्क्यांहूनही अधिक समभाग मूल्य सूट मिळालेल्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी नोंदणीकरिता २ लाख रुपयेपर्यंतच्या अटीची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. प्रति समभाग १,१९५ रुपये दराप्रमाणे सरकारने ५ टक्के हिस्सा विक्री करताना ९७.४८ लाख समभाग विकले आहेत. पैकी ७७.९८ समभाग संस्थागत गुंतवणूकदारांना मिळणार आहेत. ‘कॉन्कॉर’ला बुधवारी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार संस्थांकडून दुप्पट प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्यासाठी जारी केलेल्या समभाग मूल्यात ५ टक्के सवलत देण्यात आली होती. यामुळे चालू आर्थिक वर्षांत सात कंपन्यांच्या निर्गुतवणुकीच्या माध्यमातून सरकारने १९,५१७ कोटी रुपये उभारले आहेत.
सरकारने २५,००० कोटी रुपयांचे लक्ष्य राखले आहे. ते आधीच्या ४१,००० कोटी रुपयांवरून कमी करण्यात आले आहे. यापूर्वी आयओसी, आयईएल, पीएफसी, आरईसी, ड्रेजिंग कॉर्पोरेशनमध्ये निर्गुतवणूक झाली आहे. गेल्याच महिन्यात एनटीपीसीतील ५ टक्के निर्गुतवणुकीची प्रक्रिया राबविली होती.

Untitled-32