ब्रिटनमधील पोलाद कंपन्यांना हात

टाटा समूहाने ब्रिटनमधील पोलाद प्रकल्प बंद करण्याचा इरादा जाहीर केला असून या तोटय़ातील कंपन्यांना मदत केली जाईल, असे ब्रिटन सरकारने जाहीर केले.
टाटा समूहाचा पोर्ट टालबोट प्रकल्प तोटय़ात असल्याने विकण्यात येणार आहे, पण कुणी ग्राहक मिळाले नाही तर तो बंद करण्यात येईल, असे कंपनीच्या प्रवक्तयांनी म्हटले आहे.
दरम्यान, व्यापार मंत्री साजिद जावेद यांनी सांगितले, की या कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा विचार नाही पण तशी शक्यता नाकारताही येत नाही. सध्या तरी कुठली शक्यता फेटाळता येणार नाही, पण राष्ट्रीयीकरण हा शेवटचा उपाय असेल. अजूनही कंपनीला ग्राहक शोधण्यासाठी वेळ आहे. सर्व पर्याय अजमावले जातील व विक्रीस अनुकूलता निर्माण केली जाईल. पोर्ट टालबोट व टाटा स्टीलच्या ब्रिटनमधील मालमत्तांना ग्राहक मिळतील. टाटा कंपनी लवकरच विक्री प्रस्ताव मांडणार आहे. या प्रकल्पांच्या खरेदीसाठी भारतीय वंशाचे पोलाद सम्राट संजीव गुप्ता प्रयत्नशील आहेत.
गुप्ता यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, चर्चा अजून प्राथमिक स्थितीत आहे व पुढील बोलणी उद्या सुरू होतील. माझ्या सूचना कंपनीतील लोक, कामगार व सरकारने विचारात घेतल्या तर चर्चा करीन, असे गुप्ता यांनी ‘द संडे टेलिग्राफ’ला सांगितले.
गुप्ता यांना पोर्ट टालबोटच्या पारंपरिक भट्टय़ा आधुनिक करण्यासाठी सरकारची मदत हवी आहे. कार्बन करातही सवलत हवी आहे.