अर्थसंकटाच्या फेऱ्यातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्या बंद करून मोडीत काढण्याचा अथवा त्यांच्या विलीनीकरणाचा पर्याय सरकारपुढे उरला असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी), एमएमटीसी, प्रोजेक्ट अ‍ॅण्ड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीईसी) या तीन कंपन्यांबाबत वाणिज्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत.

यापैकी एमएमटीसी ही कंपनी सोने आयात करणारी कंपनी आहे. १९६३ मध्ये अस्तित्वात आलेली एमएमटीसी एसटीसीपासून विलग करण्यात आली.

एसटीसीने गेल्या वित्त वर्षांत ८८१ कोटी रुपयांचा करोत्तर तोटा नोंदविला आहे. कंपनीने या दरम्यान ६२६ कोटी रुपये निर्लेखित केल्यामुळे ताळेबंदावर ताण आला आहे. १९५६ मध्ये स्थापना असलेली ही कंपनी पूर्व युरोपातील देशांमधील व्यापाराकरिता मंच असलेली कंपनी आहे.

पीईसी ही एसटीसीची १९७१ मध्ये उपकंपनी म्हणून अस्तित्वात आली. रेल्वे तसेच अभियांत्रिकी उपकरणाच्या निर्यातीकरिता व्यवहार करणाऱ्या या कंपनीचे १९९७ मध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले.