नवी दिल्ली : देशातील एकमेव सार्वजनिक नागरी हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियातील सर्व, १०० टक्के हिस्सा खरेदीसाठी बोली मागविण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबविण्यात आली आहे. याबाबतची मुदत मंगळवारी संपत असतानाच इच्छुक बोलीधारकांसाठी ती ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिस्तरीय समितीने शुक्रवारी एअर इंडियाच्या बोली प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने परिपत्रक काढून निर्णय जाहीर केला. उत्सुक बोलीधारकांच्या विनंतीनुसार प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. नव्या धोरणानुसार, जानेवारी २०२० मध्ये सरकारने एअर इंडियाच्या निर्गुतवणूक प्रक्रियेला सुरुवात केली. यानुसार प्रमुख एअर इंडियातील १०० टक्के, तर एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेडमधील एअर इंडियाचा १०० टक्के व एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमधील ५० टक्के हिस्सा विकण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या खरेदीकरिता २०१८ मध्ये प्रतिसाद न मिळाल्याने केंद्र सरकारने २७ जानेवारी रोजी सरकारी कंपनीतील ७६ टक्क्यांऐवजी १०० टक्के हिस्सा विक्रीचा निर्णय घेतला. निव्वळ मालमत्ता ३,५०० कोटी रुपये असणाऱ्या कंपन्या एअर इंडियाच्या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात.