दिवाळीत गुंतवणुकीसाठी खुले होणार!
बहुप्रतीक्षित सार्वभौम सुवर्ण रोख्यांवरील व्याजदराची अनिश्चितता अखेर शुक्रवारी संपुष्टात आली. सुवर्ण रोख्यांवर वार्षिक २.७५ टक्के व्याज दिले जाणार असून या रोख्यांची नोंदणी येत्या दिवाळीच्या कालावधीत गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे.
धातू स्वरूपातील सोन्याला पर्याय असलेल्या या योजनेचा तपशील केंद्रीय वित्त मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा सादर केला. यानुसार, आठ वर्षे कालावधीचे हे रोखे असतील तसेच पाचव्या वर्षांनंतर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध असेल.
या सुवर्ण रोख्यांसाठी येत्या ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान नोंदणी करणे आवश्यक असून पात्र गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबर रोजी ते बहाल केले जातील. निवडक टपाल कार्यालये व बँका यामार्फत हे रोखे नोंदणीसाठी तसेच ते स्वीकारण्यासाठी उपलब्ध असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सुवर्ण रोख्यांवरील व्याज हे करपात्र असेल तसेच त्यामार्फत होणारा भांडवली लाभ हा धातू स्वरूपातील सोन्यावर आकारतात त्यानुसार असेल. कर्जासाठी हे रोखे तारण म्हणून उपयोगात आणता येतील. तसेच सुवर्ण कर्जासाठीही हे रोखे ग्राह्य़ असतील. सुवर्ण रोखे हाताळणी म्हणून नोंदणीकृत रकमेवर एक टक्का लागेल.
किमान २ ग्रॅम वजनाच्या मूल्याइतकी रोखे खरेदी करावी लागणार असून गुंतवणूकदाराला प्रत्येक वर्षी कमाल ५०० ग्रॅम वजनाच्या मूल्याइतके रोखे खरीदता येतील. रोख्यांचे मूल्य हे भारतीय चलनात निश्चित केले जाईल व सोन्याचा दर हा ‘इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन’च्या ९९९ शुद्धतेच्या सोमवार ते शुक्रवारमधील सरासरी दरानुसार असेल.

* ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान प्रारंभिक विक्री
* मुदत कालावधी ८ वर्षे, पाचव्या वर्षांनंतर निर्गमन शक्य
* किमान २ ग्रॅम आणि कमाल ५०० ग्रॅम सुवर्णमूल्याइतकी गुंतवणूक