05 March 2021

News Flash

मल्या-मोदी पसार झाल्यानंतर सरकारची सज्जता

संभाव्य ९१ कर्जबुडव्यांचा देशाबाहेर पलायनाचा मार्ग रोखणार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

संभाव्य ९१ कर्जबुडव्यांचा देशाबाहेर पलायनाचा मार्ग रोखणार

विजय मल्या, नीरव मोदीसारख्यांनी बँकांची कोटय़वधी रुपयांची कर्ज बुडवून बिनबोभाट भारताबाहेर पलायन केल्याच्या अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर सरकार आता विविध ९१ कर्जबुडव्यांचा देशाबाहेरील मार्ग रोखण्याच्या प्रयत्नाला अंतिम रूप देत असल्याचे समजत आहे.

निर्ढावलेले कर्जबुडवे (विल्फुल डिफॉल्टर्स) म्हणून विविध ४०० कंपन्यांची आणि त्यांच्या प्रवर्तकांची नावे यापूर्वीच जाहीर झाली आहेत. त्यातील संभाव्य ९१ पळ काढणाऱ्यांची नावे तपास यंत्रणांनी निश्चित केली असून त्यांना भारताबाहेर जाण्यापासून परावृत्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळते. सरकारने निश्चित केलेल्या ९१ निर्ढावलेल्या कर्जदारांच्या विविध कंपन्यांनी भारतातील काही बँकांमार्फत कोटय़वधींचे कर्ज घेतले आहे. त्यातील अनेक कर्जे ही काही वर्षांपासून थकीत आहेत.

५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांच्या पारपत्राविषयीची सविस्तर माहिती यापूर्वीच तपास यंत्रणांनी बँकांकडे मागितली आहे. ही ९१ नावे या यादीतूनच निश्चित केली गेली असून त्यांचा भारताबाहेर जाण्याचा मार्ग हरतऱ्हेने थोपविला जावा अशा सूचनाही देण्यात आल्याचे कळते.

किंगफिशर एअरलाइन्सने विविध १७ बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकविल्यानंतर मुख्य प्रवर्तक विजय मल्याने ब्रिटनमध्ये आसरा घेतला, तर जानेवारी २०१८ अखेरीस उघडकीस आलेल्या बँक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा थकीत कर्ज फसवणूक प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच त्यात गुंतलेले हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, निशाल मोदी, जतीन मेहता हे फरार झाले. थकीत कर्जे असणारे ३१ कर्जदार सध्या भारताबाहेरच असल्याची माहिती दोनच दिवसांपूर्वी संसदेतही सरकारने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:46 am

Web Title: government may ban 91defaulters from leaving india
Next Stories
1 ‘पीएनबी’चे बनावट हमीपत्राद्वारे घोटाळ्याचे आणखी एक प्रकरण
2 सरकारी बँकांसंबंधाने रिझव्‍‌र्ह बँकेचे अधिकार मर्यादितच!
3 सद्य:काळात ‘युलिप’चे काय करायचे?
Just Now!
X