पुढाऱ्यांनी पैशांची उधळपट्टी केल्यानेच डबघाईस आलेल्या नागपूर बँकेला सरकारने मदतीचा हात पुढे केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बुलढाणा आणि वर्धा या दोन जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीतून बाहेर काढण्यासाठी १७० कोटी रुपये देण्याचे सरकारच्या पातळीवर घाटत आहे. एकूणच पुढाऱ्यांनी लूट करायची आणि जनतेच्या कराच्या माध्यमातून जमा होणारा निधी या बँका पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने खर्च करायचा हे दृष्टचक्रच महाराष्ट्रात सुरू झाले आहे.
नागपूर बँक अडचणीत असल्याने यंदा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची या बँकेची ऐपत नव्हती. नागपूर जिल्ह्य़ात शेतकऱ्यांना ८०० कोटींचे कर्जाचे वाटप होणार असून यापैकी २२५ कोटी हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून केले जातील. यासाठी ७५ कोटी रुपयांच्या राज्य सहकारी बँकेच्या कर्जाला सरकारने हमी दिली. नागपूर बँक ही काँग्रेसच्या ताब्यात असल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यातील वर्धा आणि बुलढाणा या दोन बँकांना मदत होणार आहे. बुलढाणा जिल्हा बँक अडचणीतून बाहेर काढण्याकरिता १०० कोटींची आवश्यकता असून, वर्धा बँकेला ७० कोटी रुपये लागणार आहेत. अशी एकूण १७० कोटी रुपये देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या ताब्यातील बँकेला ७५ कोटी रुपयांची हमी दिल्यावर आता वर्धा आणि बुलढाणा बँकांसाठी सरकार १७० कोटी देणार हे स्पष्टच आहे. उस्मनाबाद जिल्हा बँक स्वत:च्या पायावर उभी राहिल्याने शासनाला तेवढाच दिलासा मिळाला आहे.
भूविकास बँकांचा निर्णय होणार
आर्थिकदृष्टय़ा डबघाईल आलेल्या राज्यातील २८ भूविकास बँकांचे भवितव्य ठरविण्याकरिता येत्या २५ तारखेला बैठक आयोजित करण्यात आली आहे. भूविकास बँकांना सुमारे १८०० कोटींचा तोटा झाला असून, ६०० कोटींपेक्षा जास्त कर्जाचा बोजा आहे. बँकांचा कारभार ठप्प झाला असताना १३०० कर्मचाऱ्यांच्या वेतनावर शासनाचे २००कोटी खर्च झाले आहेत. या बँकांची ६४ ठिकाणी मालमत्ता असून त्याची विक्री केल्यास ५०० कोटी रुपये मिळतील, अशी शक्यता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. या बँकांचे इतरत्र विलिनीकरण करण्याचा शासनाचा विचार आहे.

मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशनची आज निवडणूक
गृहनिर्माण चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या मुंबई जिल्हा को-ऑप हौसिंग फेडरेशनच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी १५ जूनला होत असून, सहकार चळवळीत अनेक वर्षे काम केलेले मातब्बर निवडणुकीच्या आखाडय़ात आपले नशीब आजमावत आहेत.
श्री समर्थ कृपा सहकार पॅनेलद्वारे हौसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. डी. एस. वडेर आणि कामगार नेते अनिल सावंत यांची या निवडणूक प्रचारात प्रारंभापासूनच आघाडी राहिली आहे. मुंबै बँकेचे संचालक बी. डी. पारले आणि संचालिका अ‍ॅड. विजयाताई भोगले-पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे मानद सचिव वसंतराव देशमुख, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष वसंतराव शिंदे, पगारदार सहकारी संस्था संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खोपडे, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष कृष्णा शेलार आदीच्या सहकार क्रांती पॅनेलनेही त्यांना पाठींबा व्यक्त केला आहे.