२००, ५०० रुपयांच्या नोटांची छपाई आता चोवीस तास; ७०,००० कोटी रुपयांची गरजपूर्तता होणार

 नवी दिल्ली : देशात उद्भवलेल्या रोकडटंचाईचा सामान्यांना फटका बसल्यानंतर तसेच याबाबत रिझव्‍‌र्ह बँक, सरकारवर झोड उठल्यानंतर चलनाच्या छपाईचा वेग वाढविण्यात आला आहे. २०० तसेच ५०० रुपयांच्या नोटांची छपाई आता चोवीस तास करण्यात येत आहे.

अर्थव्यवस्थेत सध्या ७०,००० कोटी रुपयांच्या चलनाची कमतरता असून रोकडटंचाईपूर्वी नोटा छपाईचा कालावधी दिवसातील १८ तास होता. तो आता २४ तास करण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

आतापर्यंत तीन ते चार तासांचा अवधी घेत नोटांची छपाई केली जात होती; मात्र आता ती अहोरात्र करण्यास सुरुवात झाली असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

यापूर्वी अशी २४ तास नोटा छपाई २,००० रुपयांच्या नोटांकरिता होत होती, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

खातेदारांच्या चिंतेने बँक कर्मचारी त्रस्त; स्थिती न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा

बँक एटीएमध्ये अपुऱ्या प्रमाणात रोकड असल्याचा मनस्ताप बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही होत आहे. एटीएममधून पैसे मिळत नसल्याने ग्राहक थेट बँकेतील कर्मचाऱ्यांना गाठत असून त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाव्ंो लागत आहे. या मनस्तापातून बँक कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने याबाबतची परिस्थिती लवकर नियंत्रणात आणावी, असे ‘ऑल इंडिया बँक्स एम्प्लॉईज असोसिएशन’ने म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुरेशी रोकड मिळत नसून एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या वाहतूक व्यवस्थांमुळे बँक कर्मचाऱ्यांना मात्र ग्राहक, खातेदारांच्या संतापाला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रियाही देण्यात आली आहे.

रक्कम काढण्यासाठी पीओएस मशीनवर शुल्क नाही

रोकड टंचाईत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने दिला आहे. पीओएस मशीनच्या माध्यमातून दिवसाला २,००० रुपयेपर्यंत रक्कम काढल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. छोटय़ा शहरातील ग्राहकांना याचा अधिक लाभ होईल. पीओएस मशीनद्वारे छोटय़ा शहरांमध्ये २,००० रुपयेपर्यंत तर मोठय़ा शहरांमध्ये १,००० रुपयेपर्यंत रक्कम काढता येते. स्टेट बँकेच्या देशभरातील ४.७८ लाख पीओएस मशीनकरिता ही शुल्क मुभा लागू होणार आहे. बँकेच्या एकूण ६.०८ लाख पीओएस मशीनपैकी ४.७ ८ लाख पीओएस मशीनच्या माध्यमातून रोकड काढण्याची सुविधा आहे.

रोकड टंचाईबाबतची स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल. देशात पुरेशा प्रमाणात रोकड असून अन्य काही कारणाने त्यात अडथळा निर्माण झाला आहे.

– मनोज सिन्हा,  केंद्रीय दूरसंचार मंत्री.