महानगर टेलिफोन निगम अर्थात एमटीएनएलनेही कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनेचा तपशील जारी केला आहे. याबाबतची अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली असून या योजनेत असलेल्या काही संदिग्ध बाबी एमटीएनएलचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या चर्चेनंतर दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेत कंपनीचे ८ ते १० हजार कर्मचारी कमी होतील, असा अंदाज आहे.

एमटीएनएलच्या मुंबई व दिल्लीतील ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना ४ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करावयाचा आहे. या योजनेनुसार आतापर्यंत झालेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षांपोटी ३५ दिवसांचे वेतन आणि निवृत्त होईपर्यंत शिल्लक असलेल्या प्रत्येक वर्षांपोटी २५ दिवसांचे वेतन अशा रीतीने एकत्रित रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाणार आहेत. मात्र ही रक्कम उर्वरित सेवेच्या वर्षांमध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या एकत्रित रकमेपेक्षा कमी असावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना २०१९-२० आणि १९२०-२१ या दोन वर्षांत प्रत्येक ५० टक्के सानुग्रह अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. ३१ जानेवारी २०२० पासून ही योजना लागू होणार आहे.

या योजनेत ५८ हे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करण्यात आले आहे. त्यास कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र ही तारीख दूरसंचार विभागाने निश्चित केली असली तरी स्वेच्छानिवृत्ती योजनेला किती प्रतिसाद मिळतो, यावर दूरसंचार विभाग सेवानिवृत्तीचे वय निश्चित करणार असल्याचेही एमटीएनएल व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मात्र साठीनंतर महिन्याभरात मिळणार आहे. ५० वर्षे वा अधिक वयाचे ८,००० कर्मचारी योजनेत सहभागी होणे अपेक्षित आहे.