सहकारी संस्थांच्या   मेळाव्याची मागणी
सहकारी चळवळीतील काही नागरी सहकारी पतसंस्था चुकीच्या व्यवस्थापनामुळे अडचणीत आल्या आहेत, तरी या संस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काही नावाजलेल्या नागरी सहकारी संस्थांवर सहकार खात्याकडून सुरू असलेले दबावतंत्र चुकीचे असून, अशा आजारी संस्थांसाठी शासनानेच निधी उपलब्ध करून द्यायला हवा, असे प्रतिपादन मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष कृष्णा शेलार यांनी केले. मुंबई ग्राहक सहकारी संस्था महासंघाच्या वतीने बृहन्मुंबईतील प्राथमिक ग्राहक सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींच्या अलीकडे वांद्रे येथे आयोजिण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष बी. डी. पारले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई महानगर पालिकेचे उपमहापौर मोहन मिठबावकर यांच्या हस्ते झाले.
सहकारी संस्थांच्या कामकाजात व्यावसायिकता येणे आवश्यक असल्याची कबुली देत, त्या संबंधाने छोटय़ा-छोटय़ा संस्थांमध्ये सुसूत्रता व समन्वयासाठी त्यांचे एक ऑनलाइन जाळे विणण्याचे काम सुरू असल्याचे याप्रसंगी बोलताना, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघाचे मानद सचिव वसंतराव देशमुख यांनी माहिती दिली. प्राप्तिकर विभागाकडून सहकारी पतसंस्थांना मोठय़ा प्रमाणात नोटिसा आल्या आहेत. या तोडग्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याचेही त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.