केंद्र सरकारचे प्रत्यक्ष कराचे चालू आर्थिक वर्षांचे उद्दिष्टही पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. २०१४-१५ साठी प्राप्तिकर विभागाने ७,०५,००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट राखले आहे. मात्र २४ मार्चपर्यंत ते केवळ ६,३०,००० कोटी रुपयेच साध्य झाले आहे.
निर्मिती क्षेत्रासह एकूण अर्थव्यवस्था मंदीत असूनही अग्रीम करापोटी कंपन्यांनी भरलेल्या चालू आर्थिक वर्षांतील चौथ्या तिमाहीची रक्कम वाढली आहे. स्टेट बँक, एलआयसी, एचडीएफसीसारख्या बडय़ा कंपन्यांनी दुहेरी आकडय़ांतील वाढीचा अग्रिम कर भरणा केला आहे.
अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या ७,३६,००० कोटी रुपयांवरून नंतर हे लक्ष्य ७,०५,००० कोटी रुपयांपर्यंत खाली आणण्यात आले. मात्र ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षांच्या अखेरीसही ते पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही.
प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत जमा केलेला ६,३०,००० कोटी प्रत्यक्ष कर हा गेल्या आर्थिक वर्षांतील ५,८३,००० कोटी रुपयांपेक्षा मात्र किरकोळ, ८.२ टक्के अधिक आहे.
प्रत्यक्ष कर संकलनात देशाची आर्थिक राजधानी- मुंबई सिंहाचा वाटा राखते. शहरातून उपरोक्त कालावधीपर्यंत १,९९,४२६ कोटी रुपये प्राप्तिकर म्हणून जमा झाले आहे. आधीच्या आर्थिक वर्षांतील याच कालावधीत शहरातून जमा झालेला १,७९,७६३ कोटी रुपयांच्या प्राप्तिकरापेक्षा तो १०.९ टक्के अधिक आहे.
चालू आर्थिक वर्षांत मुंबईतून २,३०,००० कोटी रुपये कर संकलनाचे सरकारचे उद्दिष्ट आहे. दिल्ली परिमंडळातून गेल्या आर्थिक वर्षांतील ८६,६१९ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २४ मार्चपर्यंत ११.७ टक्के अधिक, ९६,७२२ कोटी रुपये कर संकलन झाले आहे.