‘महाराजा’ला लवकरच तंदुरुस्ती

केंद्र सरकारने सार्वजनिक मालकीची हवाई प्रवासी वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या पुनरुज्जीवनाच्या योजनेला अंतिम रूप दिले आहे. सर्वसमावेशक आर्थिक मदत, कंपनीच्या प्रमुख व्यवसायासाठी वेगवेगळी रणनीती, संघटनात्मक रचनेत व्यापक सुधारणा अशा उपाययोजना अनुसरून आजार जडलेल्या ‘महाराजा’ला तंदुरुस्ती प्रदान केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री जयंत सिन्हा यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

मागील सरकारच्या काळापासून वेगवेगळ्या आर्थिक पॅकेजवर तगलेल्या या विमान कंपनीला सर्व प्रकारच्या संकटातून मोकळे करून, तिला स्पर्धाशील आणि नफाक्षम हवाई वाहतूक समूह बनविण्याची योजना सरकारकडून तयार केली गेली असल्याची सिन्हा यांनी लोकसभेत माहिती दिली. कंपनीच्या ताब्यातील स्थावर मालमत्तांचा व्यापारी विनियोग आणि चलनीकरणही यातून केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एअर इंडियावर तब्बल ५५,००० कोटी रुपयांचा कर्जभार आहे.

एअर इंडियाच्या मुख्य व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसलेल्या मालमत्ता आणि कर्ज दायित्व वेगळे काढून त्या वेगळ्या कंपनीच्या नावे वर्गीकृत केल्या जातील. कंपनीच्या संघटनात्मक रचनेत आणि कारभारातही आमूलाग्र सुधारणा, तर प्रत्येक व्यावसायिक उपक्रमासाठी विशेषीकृत धोरण या पुनरुज्जीवन योजनेनुसार स्वीकारले जाणार आहे. एकूण व्यवस्थापन सक्षम बनवून उच्च कार्यक्षमता आणि सर्वोत्तम व्यवसाय प्रक्रियांचे कठोरतम पालन हा या योजनेचा प्रमुख गाभा असेल, असे सिन्हा यांनी सांगितले.

आगामी काही वर्षांत एअर इंडियाकडून वापरात नसलेल्या आणि अतिरिक्त स्थावर मालमत्तांच्या विक्री अथवा वाणिज्य हेतूने वापरही या योजनेनुसार केला जाईल. अशा देशा-विदेशांतील मालमत्ता विकून एअर इंडियाने आजतागायत ४१० कोटी रुपये उभारले आहेत. शिवाय काही मालमत्ता भाडेतत्त्वावर देऊन सुमारे ३१४ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे, अशी माहिती सिन्हा यांनी दिली. कंपनीच्या मालकीच्या जमिनी आणि स्थावर मालमत्तांचे चलनीकरणातून येणारा महसूल हा निविदा प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद आणि संबंधित विभागांकडून मिळणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रांवर अवलंबून असेल, हेही त्यांनी स्पष्ट केले.