भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) खासगीकरणाच्या माध्यमातून पैसा उभारण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारच्या ५२.९८ टक्के हिस्स्याच्या विक्रीमधून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. सध्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला विकत घेण्यामध्ये तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे. या कंपनीचे शेअर शुक्रवारी बीएसईमध्ये ०.५४ टक्क्यांनी वधारल्याचे पहायला मिळालं. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा बीपीसीएलचा एक शेअर ३८३ रुपयांना होता. तर एनएससीवर कंपनीच्या शेअर्समध्ये ०.३७ टक्केंची वाढ पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा एनएससीवर बीपीसीएलचे शेअर्स ३८२.५० रुपये प्रति शेअर हा भागव होता. तज्ञांनी बीपीसीएलच्या टार्गेट प्राइज मिड टर्ममध्ये प्रति शेअर ५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केलीय. त्यामुळेच आता सध्या कंपनीचे जे मुल्य आहे त्यापेक्षा दुप्पट किंमतीला या कंपनीमधील हिस्सेदारी विकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दुप्पट किंमत मिळवण्याचा प्रयत्न

हिंदुस्तान टाइम्सने बीपीसीएलच्या विक्रीशी संबंधित असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या खासगीकरणामधून जास्तीत जास्त पैसा उभा करण्यासाठी बीपीसीएलच्या स्टॉक्सची किंमत याच क्षेत्रातील कंपनीच्या विरोधकांच्या शेअर्स इतकी करण्याचा सरकारचा मानस आहे. तर द मिंटच्या वृत्तानुसार सरकारने जो ५२.९८ टक्के वाटा विक्रीसाठी काढला आहे त्यामधून ९० हजार कोटी रुपये उभं करण्याचं लक्ष समोर ठेवलं आहे. यामध्ये बीपीसीएलच्या इतर संपत्तीचाही समावेश आहे. सध्या शेअर बाजारातील कंपनीच्या शेअर्सच्या आधारावर सरकार कंपनीची हिस्सेदारी विकत आहे असा समज असेल तर तो चुकीचा असून सरकार कंपनीच्या मालमत्ता मूल्यांकनाचाही (Asset Valuation) विचार करत आहे, असं या प्रकरणाशी संबंधित एका तज्ज्ञाने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं आहे. सध्याच्या घडीला कंपनीची किंमत ही ४८ हजार कोटींच्या आसपास असल्याचे समजते.

कंपनीच्या इतर उद्योगांकडेही लक्ष

केंद्र सरकार बीपीसीएलच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या शेअर्ससोबत कंपनीच्या स्टॉक्सची तुलना करत आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बीपीसीएलकडे एवढी संपत्ती आहे की सरकार त्याची विक्री करुन कंपनीच्या मूळ उद्योगाला हात न लावता ४५ हजार कोटी रुपये उभे करु शकते. एमकी ग्लोबलच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील रिटेल पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये बीपीसीएलची हिस्सेदारी ही २० टक्क्यांहून अधिक आहे. बीपीसीएलसंदर्भातील व्यवहार करण्याच्या विचारत असणाऱ्या कंपन्यांना बीपीसीएलचे देशभरातील १७ हजार पेट्रोल पंपांबरोबरच गॅस उत्पादनाच्या हिस्सेदारीतही रस आहे. पेट्रोनेट एलएनजी आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडसोबतच मोजांम्बिक गॅसमध्येही बीपीसीएलची हिस्सेदारी आहे.

अपेक्षित किंमत किती

तर ईलारा कॅपिटल्सचे उपाध्यक्ष गगन दीक्षित यांनी बीपीसीएलच्या शेअर्सच्या क्षमतेबद्दल बोलताना दिर्घकालीन विचार केल्यास आताच्या किंमतीपेक्षा या शेअर्सची किंमत दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आरआयएलबीपी आणि इतर कंपन्यांदरम्यान झालेल्या व्यवहाराच्या तुलनेत बीपीसीएलची एकूण किंमत ८० हजार कोटी ते एक लाख कोटींच्यादरम्यान असू शकते. बीपीसीएच्या मोठ्या रिफायनरीची क्षमता आणि हाड्रोकार्बन निर्मितीमधील उद्योगही गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. तसेच कंपनीचा इतर क्षेत्रांमध्येही पैसा आहे. यामध्ये पाइपलाइन, एलपीजी, इंडस्ट्रीयल फ्युअल, एटीएफसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमुळे कंपनीची किंमत वाढलीय.

कोणत्या कंपन्यांनी लावली बोली

बीपीसीएलमधील सरकारच्या वाट्याचा ५२.९८ टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांता ग्रुपबरोबरच अमेरिकेतील दोन खासगी कंपन्या इक्विटी इनवेस्टर्स फर्म असणाऱ्या अपोलो ग्रोबल मॅनेजमेंट आणि आय स्वेअर्ड कॅपिटल्सची थिंक गॅसने बोली लावली आहे. बीपीसीएलला विकत घेण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी रस दाखवल्यामुळे मोठी किंमत मिळण्याची अपेक्षा सरकारला आहे.