निवडक औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याबाबतचा औषध नियामकाचा आदेश केंद्र सरकारने रद्दबातल ठरविला असून यामुळे औषध निर्मिती कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय औषध किंमत नियामक- ‘एनपीपीए’कडून याबाबतच्या नियमावलीतील परिच्छेद क्रमांक १९चा आधार घेत हृदय तसेच मधुमेहाशी संबंधित १०८ औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याबाबतचा आदेश जुलै २०१४ मध्ये देण्यात आला होता. या आदेशाला औषध निर्माण कंपन्यांनी आव्हान देण्याची तयारीही सुरू केली होती. केंद्र सरकारच्या आदेशाने नियामकाने हा आदेश मागे घेतल्याचे आता जाहीर केले आहे. केंद्रीय रसायने व खते मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या औषध विभागाने याबाबतचा आदेश रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत. नियामकाने याबाबतची मेमध्ये जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वेही मागे घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विभिन्न आजारासाठीच्या औषधांवर २५ टक्क्यांपर्यंतचे किंमत नियंत्रण कंपन्यांवर घालण्यात आले होते. औषध किंमत नियंत्रण नियमाद्वारे २०१३ मध्ये जीवनदायी अशा ३४८ औषधांच्या किमती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.