कर्जाच्या गर्तेत बुडालेल्या ग्रीसने त्यातून बाहेर पडण्यासाठी अखरे युरोझोनबरोबर संपुट योजना समझोता करार केला असून रात्रंदिवस केलेल्या चर्चेचे हे फलित आहे. युरोपीय समुदायाची या विषयावर आयोजित केलेली बैठक त्यामुळेच रद्द करण्यात आली होती.
या ऐतिहासिक करारामुळे आता ग्रीसवरचे युरो चलनातून बाहेर पडण्याचे गंडांतर टळले आहे. दरम्यान ग्रीस संकटातून बाहेर पडल्यानंतर आशियातील शेअर बाजारात तेजी आली. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले की, ग्रीस तात्पुरता संकटातून वाचला असला तरी त्यात यशाची हमी नाही. वाटाघाटीतील तरतुदींच्या अंमलबजावणीचा रस्ता फार लांब पल्ल्याचा आहे.
डावे पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस सिप्रास यांनी अतिशय कडक आर्थिक सुधारणा योजना या करारात मान्य केल्या असून सुमारे सतरा तास या वाटाघाटी चालल्या होत्या. आता या वाटाघाटीअंती ग्रीसला ९६ अब्ज डॉलर्स म्हणजे ८६ अब्ज युरो इतके कर्ज तीन वर्षांसाठी मिळणार असून पाच वर्षांत ग्रीसच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्यांदा आर्थिक मदतीचा आधार घ्यावा लागला आहे. युरोशिखर बैठकीत हा तोडगा निघाला असल्याचे युरोपीय समुदायाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. युरोपीय स्थिरता यंत्रणेतून ग्रीसला निधी दिला जाईल पण त्यासाठी त्यांनी गंभीर आर्थिक सुधारणांना मान्यता दिली आहे. २०१० पासून ग्रीसला तिसऱ्यांदा मदत द्यावी लागली आहे. सिप्रास यांना जानेवारीतील निवडीनंतर सहा महिने अर्थव्यवस्थेला मोठा संघर्ष करावा लागला, त्यात ग्रीसचे युरोझोन सदस्यत्व जाण्याची वेळ आली होती. ग्रीसमधील बँका जवळपास दोन आठवडे बंद होत्या, जादाचा युरोपीय निधी मिळाल्याशिवाय त्यांची गंगाजळी आटल्यासारखीच होती. त्यामुळे एकतर ग्रीसला स्वत:चे चलन छापावे लागले असते म्हणजेच युरोमधून बाहेर पडवे लागले असते. त्यालाच ग्रेक्झिट हा शब्द रूढ झाला होता. आता ग्रेक्झिट टळले आहे असे युरोपीय समुदायाचे अध्यक्ष क्लॉद जकर यांनी सांगितले. आता ग्रीस युरोतून बाहेर पडणार नाही. ग्रीस युरोतून बाहेर पडला असता तर त्या देशाबरोबरच जगाची अर्थव्यवस्था अस्थिर झाली असती. सिप्रास यांनी सांगितले की, आम्ही न्याय्य लढाई अंतापर्यंत लढलो, समझोता करार कठीण आहे पण लोक त्याला बहुमताने पाठिंबा देतील.

असा सुटला ग्रीसचा तिढा..
* ग्रीसला तीन वर्षांसाठी ९६ अब्ज डॉलर्सचे कर्ज
* बैठकीत ग्रीसला कर्जातून बाहेर काढण्यासाठी मदत मंजूर
* कठोर आर्थिक सुधारणांचे पालन करण्याची अट
* युरो चलनात ग्रीस कायम राहणार
* आशियातील अनेक देशांत शेअर बाजार तेजीत
* करारातील अटी पाळणे ग्रीसला आव्हानात्मक

बाजारातही उत्साह
सोमवारअखेर बंद झालेल्या आशियाई बाजाराबरोबरच प्रमुख युरोपीय निर्देशांकाचाही सोमवारचा प्रवास तेजीसह सुरू झाला. अमेरिकेच्या डाऊ जोन्सने तेजीसह सुरुवात केली. तेथीलच एस अ‍ॅन्ड पी ५०० निर्देशांक व्यवहाराच्या प्रारंभीच पंधरवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला. तर भारतीय भांडवली बाजारात हेच आशादायी चित्र  नफेखोरीत बदलले. जपान, तैवान, सिंगापूर, दक्षिण कोरिया या आशियाई बाजारातील प्रमुख निर्देशांक १.६० टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर चीनचा बिजिंग निर्देशांक, शांघाय कम्पोझिट, हाँग काँग आदी निर्देशांकही २.३० टक्क्य़ांपर्यंत वाढले होते. युरोपातील बाजारातही सुरुवातीची वाढ ही २ टक्क्य़ांपर्यंतची होती.