अंबरनाथ येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीत वाल्व्होलाइन कमिन्स लिमिटेडचा वंगणनिर्मिती प्रकल्प गुरुवारी कार्यान्वित करण्यात आला. वार्षिक १२० दशलक्ष लिटर्स क्षमता असलेला हा राज्यातील सर्वात मोठा वंगणनिर्मिती प्रकल्प आहे. अ‍ॅशलॅड इन्कॉर्पोरेशन आणि कमिन्स इंडिया यांनी १९९८ मध्ये एकत्र येत स्थापन केलेली वाल्व्होलाइन कमिन्स लिमिटेड ही सध्या वाहन तसेच औद्योगिक कारणांसाठी लागणाऱ्या वंगणाचे उत्पादन करणारी देशातील अग्रगण्य कंपनी आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहन क्षेत्र तसेच औद्योगिक उत्पादनांसाठी लागणारे वंगण तयार केले जाणार आहे. दहा एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वाल्व्होलाइन ब्रॅण्डच्या उत्पादनांची क्षमता वाढेल. तसेच देशातील ग्राहकांबरोबरच दक्षिण आशिया व अन्य शेजारील राष्ट्रांमध्येही ही उत्पादने निर्यात केली जाणार आहेत. सध्याच्या ब्लेंड लाइन्सचे मापन करण्याबरोबरच स्वयंचलित बेंच संमिश्रण तसेच इंजिन, गीयर, हायड्रोलिक इंडस्ट्रियल आणि ट्रान्समिशनसाठी लागणाऱ्या तेलजन्य पदार्थाचे उत्पादन घेता येणार आहे.
उद्घाटनपर सोहळ्यास ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक, खासदार आनंद परांजपे, अ‍ॅशलँड कन्झ्युमर मार्केट्सचे अध्यक्ष सॅम मिचेल, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कालिया, ग्रेग मफलर, नवीन गुप्ता आदी उपस्थित होते.