युरो झोनमध्येच कायम राहण्यासह नव्या कर्ज उभारणीसाठी तयार झालेल्या ग्रीसमधील बँक व्यवहार अखेर सोमवारपासून सुरळीत सुरू झाले. तब्बल तीन आठवडय़ानंतर सुरू झालेल्या देशातील अनेक बँकांच्या शाखा, एटीएममध्ये पहिल्याच दिवशी भल्या मोठय़ा लांब रांगा पहायला मिळाल्या.
दरम्यान, ग्रीस देश अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी करांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यानुसार देशात सेवा व वस्तू कर दुहेरी आकडय़ात वाढविण्यात आले असून यामुळे खाद्यान्यासह प्रवासी सेवाही महागणार आहे. तर औषधे, पुस्तके आदींवरील कर किरकोळ कमी करण्यात आले आहेत.
युरो झोनमध्ये राहण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वीपासून ग्रीसमधील व्यापारी बँका बंदच होत्या. ३ अब्ज युरोच्या कर्जाचा भार वाहणाऱ्या अर्थव्यवस्थेतील निधी कायम राहण्याच्या हेतूने बँका बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीला एक आठवडय़ासाठी बंद ठेवण्यात आलेल्या या बँका नंतर मुदतवाढ मिळाल्याने अखेर रविवापर्यंत बंद राहिल्या. याच दरम्यान बँकेतील पैसे काढून घेण्यासह नवीन कर्जे वितरित करण्यास तसेच नवीन बँक खाती सुरू करण्यावरही र्निबध घातले होते.
बँकांचे व्यवहार आता नियमित सुरू झाले असून आतापर्यंतची दिवसाला ६० युरो काढण्याची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. दिवसाला आता कमाल ३०० युरो तर आठवडय़ात ४२० युरो काढण्याची मुभा खातेदारांना आहे.