भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सलग सहाव्या तिमाहीत घसरण्याची भीती आघाडीच्या पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे. फिच समूहातील इंडिया रेटिंग्जच्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर तिमाहीदरम्यान राष्ट्रीय सकल उत्पादन ४.७ टक्के राहील.

चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील अर्थप्रवासाचे चित्र येत्या शुक्रवारी, २९ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

चालू आर्थिक वर्षांचा प्रवासच भारतीय अर्थव्यवस्थेने सुमार स्तरावरून सुरू केला होता. २०१९-२० मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढीचा दर ५ टक्के असा गेल्या सहा वर्षांतील नीचांकी नोंदला गेला. २०१३ सालामध्ये विकास दर या किमान स्तरानजीक होता.

इंडिया रेटिंग्जच्या मते, दुसऱ्या तिमाहीचा अर्थवेग प्रत्यक्षात व्यक्त अंदाजाप्रमाणे नोंदला गेल्यास ती सलग सहाव्या तिमाहीतील घसरण असेल. गेल्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारकडून कंपनी करात कपातीसह, अर्थव्यवस्थेला प्रोत्साहनपूरक अनेक योजना लागू करूनही अर्थविकासाला अद्यापही वेग येऊ शकलेला नाही.

इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने भारताचा संपूर्ण चालू आर्थिक वर्षांचा विकास दर ५.६ टक्के असेल, असे अंदाजले आहे. या संस्थेने गेल्या महिन्याभरात चौथ्यांदा विकास दरविषयक अंदाजात बदल केला आहे. यापूर्वी दुसऱ्या तिमाहीत तो ६.१ टक्के असेल, असे म्हटले होते.

इंडिया रेटिंग्जने व्यक्त केलेला विकास दर अंदाज हा काही दिवसांपूर्वीच मूडीजने व्यक्त केलेल्या ५.८ टक्के अंदाजापेक्षाही कमी आहे. देशातील काही महिन्यांपूर्वीच्या बँकेतर वित्तीय संस्थांमधील थकीत कर्जे प्रकरणाचाही अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे इंडिया रेटिंग्जने म्हटले आहे.

देशाच्या वित्तीय तुटीबाबत वित्तसंस्थेने भीतीचा सूर व्यक्त केला आहे. चालू वित्त वर्षांत ते सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या घसरणीच्या प्रमाणात  वाढेल, अशी भीती व्यक्त करतानाच चालू खात्यातील तूट मात्र १.८ टक्क्यांच्या मर्यादेत राहिल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.