भारतात आर्थिक विकासाचा वेग मंदावला असला तरी ही स्थितीत तात्पुरती असून, आगामी काळात विकासाला पुन्हा चालना मिळेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. अमेरिका आणि चीनमध्ये पहिल्या टप्प्यात व्यापार करार झाला असून त्यामुळे व्यापार तणाव कमी होणार आहे.

त्याशिवाय कर कपातही झाली आहे. हे सकारात्मक संकेत असल्याचे क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी सांगितले. ३.३ टक्के विकास दर हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अजिबात समाधानकारक नसल्याचे त्या म्हणाल्या. आर्थिक विकासाचा वेग खूपच कमी असून, आक्रमक आर्थिक धोरणांची तसेच रचनात्मक सुधारणांची आवश्यकता असल्याचे मत क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०१९-२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ४.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. भारतासारख्या मोठया बाजारपेठेचा विकास दर मंदावण्याचा अंदाज आम्ही वर्तवला आहे. पण ती स्थिती तात्पुरती असेल असे आम्हाला वाटते. इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.