लाख कोटींच्या उद्दिष्टाला ऑक्टोबर महिन्यांतही   हुलकावणी

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीतून सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात ९५,३८० कोटींचा महसूल गोळा होऊ शकल्याचे, केंद्र सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून स्पष्ट झाले. गेल्या वर्षी याच महिन्यातील जीएसटी संकलन १,००,७१० कोटी रुपये इतके होते.

सणोत्सवाचा महिना असतानाही, ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन घसरले आहे. दसरा-दिवाळीतही बाजारपेठा नरमलेल्या आणि खरेदीला अपेक्षित जोर चढू शकलेला नाही, याचेच हे प्रत्यंतर आहे. तर सलग तिसऱ्या महिन्यांत सरकारला अपेक्षित असलेले मासिक एक लाख कोटी रुपयांच्या कर-संकलनाचे लक्ष्यही हुकले आहे. सप्टेंबर २०१९ मधील कर संकलन ९१,९१६ कोटी रुपये असे होते.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, सरलेल्या महिन्यात ३० ऑक्टोबपर्यंत एकूण ७३.८८ लाख इतके स्वयंमूल्यांकन विवरण पत्रे (जीएसटीआर ३ बी) दाखल केली गेली. त्यानुसार, ९५,३८० कोटी रुपयांचा करमहसूल गोळा झाला. त्यातील केंद्रीय वस्तू-सेवा करापोटी (सीजीएसटी) १७,५८२ कोटी रुपये, राज्य वस्तू-सेवा करापोटी (एसजीएसटी) २३,६७४ कोटी रुपये आणि आयजीएसटी म्हणून ४६,५१७ कोटी रुपये (आयातीवर वसूल २१,४४६ कोटी रुपयांसह) जमा झाले आहेत, तर उपकर म्हणून ७,६०७ कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत.

‘तीनपट जीएसटी वाढ लॉटरी उद्योगासाठी मारक’

मुंबई : अलीकडेच झालेल्या ३६ व्या जीएसटी परिषदेच्या बठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने लॉटरी उद्योगावरील टांगती तलवार कायम असून, अनेक समस्यांचा सामना करीत हे क्षेत्र तग धरून आहे. जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी बक्षिसाच्या रकमेवरचा सरासरी कर हा ६.७१ टक्के इतका होता, त्यामध्ये १.२८ टक्के किंवा ०.८३ टक्के इतक्या सेवा कराचा समावेश होता. सध्याच्या रचनेत लॉटरी तिकिटांच्या दर्शनी मूल्यावर २८ टक्के जीएसटी लादल्यामुळे जवळपास करामध्ये तीन पट इतकी मोठी वाढ झाली आहे. यामुळे लॉटरी उद्योगाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, असे ‘लॉटरी ट्रेड एजंट असोसिएशन- महाराष्ट्र’ या संघटनेचे महेंद्र गणात्रा यांनी सांगितले. त्यांच्या मते, यातून विक्रेत्यांच्या महसुलावरच नव्हे तर सरकारच्या जीएसटी संकलनावरही परिणाम झाला आहे. लॉटरीपासून जीएसटी संकलन हे २० टक्क्यांनी घटले आहे. कमीतकमी १२,००० कोटींची करवसुली व्हायला हवी होती, परंतु आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये नऊ महिन्यांत केवळ रुपये ३,७२५ कोटी रुपये लॉटरी उद्योगातून जमा झाले.