News Flash

‘जीएसटी’ संकलन १.१२ लाख कोटींवर

ऑगस्ट २०२१ मध्ये जमा झालेला एकूण जीएसटी महसूल १,१२,०२० कोटी रुपये आहे.

‘जीएसटी’ संकलन १.१२ लाख कोटींवर

सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटींपुढे

सरलेल्या ऑगस्ट महिन्यात कर संकलनापोटी १.१२ लाख कोटी रुपये मिळवून, वस्तू आणि सेवा कराने (जीएसटी) सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याचे बुधवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ८६,४४९ कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये सरकारला मिळालेला महसूल ३० टक्के अधिक आहे. अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. आधीच्या महिन्यात, म्हणजेच जुलै २०२१ मध्ये जीएसटीपोटी १.१६ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. जून २०२१चा अपवाद केल्यास, त्याआधीचे सलग नऊ  महिने जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांवर टिकून होते.

ऑगस्ट २०२१ मध्ये जमा झालेला एकूण जीएसटी महसूल १,१२,०२० कोटी रुपये आहे. यात केंद्रीय जीएसटीचा वाटा २०,५२२ कोटी रुपये इतका आहे तर राज्यांनी वसूल केलेल्या जीएसटीचा वाटा २६,६०५ कोटी रुपये इतका आहे. एकत्रितरीत्या वसूल केलेल्या एकात्मिक जीएसटीपोटी ५६,२४७, कोटी रुपये मिळाले आहेत. आयात केलेल्या वस्तूंवर आकारण्यात आलेल्या २६,८८४ कोटी रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे. तर ८,६४६ कोटी रुपयांच्या उपकराची वसुली झाली आहे. यात आयात वस्तूंवर आकारण्यात आलेल्या ६४६ कोटी रुपयांच्या उपकराचा समावेश आहे.

पापड ‘जीएसटी’मुक्त

लोकांच्या आहाराचा एक भाग असलेले ‘पापड’ मग ते देशभरात कोणत्याही नावाने ओळखले जात असो अथवा कोणत्याही आकारात उपलब्ध असो, यापुढे त्यांना पूर्णपणे वस्तू व सेवा करातून मोकळीक दिली गेली आहे. आरपीजी एंटरप्राइजचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी पापडावरील करवसुलीसंबंधी विसंगतीवर बोट ठेवताना केलेल्या टिप्पणीनंतर केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने बुधवारी हा खुलासा केला आहे.  गोएंका यांनी मंगळवारी केलेल्या टी्वटमध्ये, ‘गोलाकार पापड हे करमुक्त, तर चौरस पापडावर मात्र जीएसटीचा भार. यामागचे तर्कट समजावून देणारा चांगला सनदी लेखापाल कोणी मला सुचवू शकेल काय?’ असा उपरोधाने सवाल केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 12:01 am

Web Title: gst collection one lakh crore akp 94
Next Stories
1 ‘यूपीआय’ व्यवहारांची कोटीच्या कोटी उड्डाणे
2 सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा १० ग्रॅम सोने-चांदीचा भाव
3 उत्पादनात ६० टक्के घसरणीचे ‘मारुती सुझुकी’कडून संकेत
Just Now!
X