नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ने  चालू आर्थिक वर्षांत पहिल्यांदाच मासिक एक लाख कोटी रुपयांच्या करसंकलन टप्पा ओलांडला आहे.

सरलेल्या जुलै महिन्यात ढोबळ वस्तू व सेवा कर संकलन १.०२ लाख कोटी रुपये नोंदले गेले असल्याचे अर्थमंत्रालयाने गुरुवारी रात्री स्पष्ट केले. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील पहिल्या चार महिन्यांत प्रथमच सरकारला कर संकलनाचे अपेक्षित लक्ष्य गाठण्यात यश मिळाले आहे. तर ही करप्रणाली लागू झाल्यापासून, कर संकलनाची एक लाख कोटींची पातळी गाठण्याची ही तिसरीच खेप आहे.

गेल्या वर्षी याच महिन्यांत म्हणजे जुलै २०१८ मध्ये जीएसटी संकलन ९६,४८३ कोटी रुपये होते. वार्षिक तुलनेत त्यात ५.८ टक्के वाढ झाली आहे. तर जून २०१९ मध्ये अप्रत्यक्ष कर संकलन ९९,९३९ कोटी रुपये होते.

जुलैअखेर वस्तू व सेवा कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या ७५.७९ लाखांवर पोहोचली आहे. दोन वर्षे पूर्ण होत असलेल्या या प्रणालींतर्गत एप्रिल ते जुलै २०१९ दरम्यान ४.१६ लाख कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष कर संकलन झाले आहे.