साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या गुडीपाडवा हा नवीन गृहखरेदीसाठी महत्त्वाचा दिवस. बांधकाम व्यवसाय सध्या एक दीर्घ मंदीचा सामना करीत असल्याने गेली दोन वर्षे गुढीपाडवा हा या क्षेत्रासाठी सर्वसामान्य दिवस होता. आजच्या गढीपाडव्याच्या निमित्ताने विकासक व मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे सचिव संदीप कोलटकर यांच्याशी केलेल्या वार्तालापाचा हा संपादित अंश

स्थावर मालमत्ता क्षेत्र दीर्घकाल मंदीचा सामना करीत आहे. आणि गृह खरेदीसाठी चांगला मुहूर्त असणारा पाडवा येऊन ठेपला आहे. हा पाडवा बांधकाम व्यवसायाची गुढी उंच उभारेल, असे वाटते का?

स्थावर मालमत्ता विकास क्षेत्र एका दीर्घकालीन मंदीचा सामना करीत आहे. निश्चलनीकरणानंतर गृहखरेदी इच्छुकांचे चौकशी करणारे दूरध्वनी व बांधकाम स्थळी भेटी नक्कीच वाढल्या आहेत. निश्चलनीकरणाची घोषणा होऊन साडेपाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे.

अर्थव्यवस्थेत चलनी नोटांचे सरकारकडून पुनर्भरण पूर्ण होत आलेले आहे. याचा परिणाम स्थावर मालमत्ता विकास क्षेत्रावर होत आहे. आणि ग्राहकांचा प्रतिसादसुद्धा सकारात्मक आहे. म्हणूनच यंदाचा पाडवा हा स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी मागील दोन वर्षांंसारखा न जाता या क्षेत्राला दिलासा देणारा नक्कीच असेल अशी आशा आहे.

एका बाजूला भारत हा तरुणांचा देश असल्याबद्दल आपण भाग्यवान समजतो. सरासरी लोकसंख्या ही पहिले घर खरेदी करण्याच्या वयातील असूनही बांधकाम क्षेत्राला मंदीचा सामना का करावा लागतो आहे?

भारतातील लोकसंख्येचे सरासरी वय हे पहिले घर खरेदी करण्याच्या वयाचे आहे हे खरे असले तरी स्थावर मालमत्ता विकास क्षेत्र हे अन्य उद्योगांचे प्रतिबिंब असते. जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा १५-२० वर्षे कर्ज फेडण्याची तुमची बांधलीकी असते. आमचे बहुतेक प्रकल्प पुणे व आजूबाजूच्या परिसरात सुरू आहेत.

आज व्यापारी वाहन क्षेत्र हे मंदीचा सामना करीत आहे. माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रात अमेरिकेच्या बदलत्या धोरणाची भीती असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती वाटत नाही. अन्य उद्योगात सर्व व्यवस्थित सुरू आहे, अशी परिस्थिती नक्कीच नाही.

साहजिकच जोखीम स्वीकारून दीर्घ काळासाठी कर्ज फेडण्याची मानसिकता नाही. परिणामी नवीनकर्ज घेण्यास कोणीपुढे येत नसल्याने बांधकाम क्षेत्र दीर्घ काळ मंदीचा सामना करीत आहे. परिस्थितीत सुधारणा जशी जशी होत जाईल व ग्राहकांची मानसिकता बदलेल तशी त्यांची कर्जाची जोखीम स्वीकारण्याची मानसिकता वाढेल.

असे म्हटले जाते की घरांच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाणे हे एक मंदीचे दुसरे कारण आहे. तुम्ही काय सांगाल?

घरांच्या किंमती मागील काही वर्षांत वेगाने वाढल्या आहेत हे खरे असले तरी यासाठी विकासकांना दोषी धरता येणार नाही. जमीन बांधकाम साहित्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या किंमती विकासकांच्या नियंत्रणात नाहीत. सरकारने बांधकाम क्षेत्राचे नियम बदलले. सरकारकडून किंवा  स्थानिक प्रशानाकडून चटई क्षेत्रफळ विकत घेण्यासाठी स्थानिक प्रशासन यांना द्यावे लागणाऱ्या अधिमुल्यात मोठी वाढ झाली आहे. या सगळ्याचा परिणाम बांधकामाच्या किंमतीत वाढ होण्यात झाली आहे.

जेव्हा मागणी वाढते तेव्हा किंमती वर जातातच. मालमत्ता विकास उद्योग मोठय़ा प्रमाणावर रोजगाराची निर्मिती करतो. बांधकाम क्षेत्राकडून सरकारला मिळणारा कर हा महसुलाचा मोठा हिस्सा आहे. याचा विचार करून सरकारने कर आकारणी दराच्या बाबतीत सौम्य धोरण स्वीकारले तर  घराच्या किंमती नक्कीच आवाक्यात ठेवण्यास विकासकांना मदत होईल.

इच्छुकांच्या मनात आज नवीन गृहखरेदी करावी असे वाटत असेल काय? विकासक म्हणून तुमचा काय सल्ला आहे?

बँकांकडे निश्चलनीकरणानंतर ठेवी संकलन मोठय़ा प्रमाणात झाले आहे. याचा परिणाम बँकांचे गृहकर्जाचे दर सध्या हे गेल्या १० वर्षांच्या तळाला आहेत. विकासक मागील दोन वर्षे मागणी अभावी किंमतीत वाढ करू शकलेले नाहीत.

दोन वर्षांपूवी प्रकल्प सुरू झाले तेव्हा ज्या किंमतीत घरे उपलब्ध होती त्याच किंमतीत आजही घरे मिळत आहेत. त्यामुळे नवीन ग्राहकाला दोन वर्षांंपूर्वीच्या किंमतीत घर मिळत आहे. जगभरात अर्थव्यवस्थेत मोठे बदल होत आहेत. अमेरिकेत व्याजाचे दर वाढविण्याचे घटत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने धोरणदिशा बदलली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेची ऋणनीती उदार धोराणांकडून तटस्थ धोरणाकडे बदलली आहे. याचा परिणाम कदाचित व्याजदर वाढीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी यापेक्षा अधिक चांगली संधी राहण्यासाठी घर खरेदीला मिळणार नाही. तेव्हा विनाविलंब याच पाडव्याला घर खरेदीचा निर्णय अमलात आणणे ग्राहकाच्या हिताचे आहे.