भारतीय कंपन्यांची संख्या दुपटीने वाढणे अपेक्षित
जगातील अग्रणी मुक्त व्यापार केंद्र असलेल्या जेबेल अली फ्री झोन (जाफ्झा) हे भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठीच नव्हे तर छोटय़ा व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांनाही निर्यात वाढ तसेच जागतिक स्तरावर अस्तित्व फैलावण्याच्या दृष्टीने आकर्षक संधींचे दालन ठरत आहे. हे पाहता तेथे सध्या कार्यरत ८०० भारतीय कंपन्यांच्या संख्येत २०२० पर्यंत तेवढीच भर पडून दुप्पट वाढ होईल, असा जाफ्झाच्या प्रवर्तकांचा विश्वास आहे.
सर्वाधिक वर्दळीचे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित जेबेल अली बंदर यांच्या सांध्यात १९९६ साली ५४ चौरस किलोमीटर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळावर जाफ्झामुक्त व्यापार क्षेत्र उभे राहिले आहे. सध्या जगभरातील १०० देशांतील ७,००० कंपन्या कार्यरत आहेत. आजही येथील २० टक्के भूक्षेत्र हे कार्यालये, गोदामे, उत्पादन स्थळे स्थापण्यासाठी मोकळे असून, अधिकाधिक कंपन्यांना सामावून घेताना आसपासची अतिरिक्त जमीनही मिळविली जाईल, असे जाफ्झाचे उप-मुख्याधिकारी इब्राहिम अल जनाही यांनी सांगितले. जागतिक स्तरावर विस्तार साधू पाहणाऱ्या भारतातील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ते सध्या मुंबई दौऱ्यावर असून, विविध उद्योजकांच्या भेटीगाठी घेत आहेत. दमदार पायाभूत सोयीसुविधा, जगभरात उत्पादनांचे वितरण विनासायास व तुलनेत कमी खर्चात शक्य करणाऱ्या सर्वोत्तम दळणवळण सुविधा, शून्य टक्के करभार, आयात-निर्यात शुल्काचा शून्य भार, १०० टक्के विदेशी मालकीची आणि विदेशातून नोकरभरतीची मुभा असे या व्यापार क्षेत्राचे जनाही यांनी फायदे सांगितले.
सध्याच्या घडीला आखाती देशसमूहानंतर जाफ्झामध्ये सर्वाधिक कंपन्या (सुमारे ८००) भारतीयांच्याच असून, तब्बल दीड लाख भारतीयांचा रोजगार व निवास त्या क्षेत्रात आहे. भारतीय उद्योगांच्या संख्येत दरसाल ५ ते ६ टक्के दराने होत असलेली वाढ दोन अंकी स्तरावर जाईल, असे जनाही यांना अपेक्षित आहे.
‘मेड इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न भारताला जगाचे उत्पादन केंद्र बनविण्याचे असले, तरी प्रस्थापित भारतीय कंपन्यांना जागतिक बाजारपेठेशी सहज सान्निध्याचा मार्ग हा जाफ्झामधून खुला होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. किंबहुना पंतप्रधान मोदी यांच्या उद्योग क्षेत्राला प्रोत्साहनाच्या धोरणातून भारतीय कंपन्यांच्या जाफ्झाच्या दिशेने संक्रमणाला आणखी बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.