दोन कामगारांच्या निलंबनावरून महिंद्र अॅण्ड महिंद्रच्या इगतपुरी प्रकल्पातील कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर १३ दिवसांनंतर अखेर मागे घेण्यात आले. निलंबित केलेल्या दोन कामगारांनी बिनशर्त माफीनामा सादर केल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांचे निलंबन मागे घेऊन या विषयावर पडदा टाकला. सोमवारी दुपारनंतर प्रकल्पातील कामकाज पूर्ववत सुरू झाले.
इगतपुरी शहरातील महिंद्र प्रकल्पात ९ एप्रिल रोजी कामगार सेनेचे अध्यक्ष सुनील यादव व मदन जाधव यांच्यात हाणामारी झाली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कंपनीने दोघांना निलंबित करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी संबंधितांवरील कारवाई मागे घ्यावी म्हणून काम बंद आंदोलन सुरू केले. निलंबित केलेल्या कामगारांना कामावर घेतले जात नाही तोपर्यंत काम न करण्याचा पवित्रा कामगारांनी घेतल्याने प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया सलग १३ दिवस ठप्प राहिली. कामगार उपायुक्त कार्यालयाचा मध्यस्थीचा प्रयत्नही असफल ठरला.
काम बंद आंदोलनामुळे महिंद्रसह या प्रकल्पावर अवलंबून असलेले इतर छोटय़ा-मोठय़ा उद्योगांवरही विपरीत परिणाम होऊ लागला. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थानाबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांची ही मध्यस्थी कामी आली. कामगार सेनेचे सूर्यकांत महाडिक यांच्याशी झालेल्या चर्चेत ठाकरे यांनी निलंबित कामगारांनी माफीनामा सादर करावा, असे सूचित केले. तसेच कामगारांनी तातडीने कामावर हजर व्हावे, अशी सूचना केली. व्यवस्थापनाने कामगारांबाबत सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. या घडामोडीनंतर सोमवारी निलंबित कामगारांनी माफीनामा व्यवस्थापनाकडे सादर केला. व्यवस्थापनाने संबंधितांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आणि सोमवारी ११ वाजल्यापासून प्रकल्पातील कामकाज पूर्ववत सुरू झाल्याची माहिती कंपनीचे उपमहाव्यवस्थापक नितीन देशपांडे यांनी दिली.