२२ हजार कोटींच्या बाजारमूल्याचा ऱ्हास

अमेरिकेतील एच १-बी व्हिसा सुधारणा कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्चपदस्थ व अधिक वेतनाच्या नोकरीतील भारतीयांचा मार्ग मोकळा झाल्याच्या निर्णयाचा स्थानिक भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना फटका बसला. त्यातच नफेखोरीमुळे वरच्या भावावर असलेल्या या समभागांची विक्री झाली. परिणामी मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

भारतासारख्या देशातील कुशल कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठय़ा वेतनाच्या नोकरीचा मार्ग अमेरिकी काँग्रेसने खुला केला आहे. ही बाब ८० टक्क्यांहून अधिक महसूल अमेरिकेसारख्या देशातून आऊटसोर्सिगद्वारे मिळविणाऱ्या भारतीय माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांसाठी नकारात्मक मानली गेली.

सप्ताहअखेर सेन्सेक्स शतकाहून अंश घसरणीमुळे २६,७६० नजीक पोहोचला आहे. तर ३० अंश घसरणीमुळे निफ्टी शुक्रवारअखेर ८,३०० पासून अधिक लांब जात ८,२५० च्याही खाली आला आहे. अमेरिकेचा निर्णय तसेच येत्या आठवडय़ापासून जाहीर होणारे तिसऱ्या तिमाहीचे निकालही विक्रीला कारण ठरले.