कायदे सल्लागार संस्था ‘फखौरी’चा कयास
रोजगारानिमित्त होणाऱ्या स्थलांतराच्या प्रक्रियेत कायदेशीर सल्ला देणारी संस्था ‘फखौरी लॉ ग्रुप’ने अमेरिकेत व्हिसाविषयक नियम उत्तरोत्तर कठोर बनत गेले असले तरी त्याचा भारतीय व्यावसायिकांचा वाढता ओघ कमी होणे संभवत नसल्याचे सांगितले.
विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘विशेषज्ञ व्यावसायिकां’च्या स्थलांतरासाठी आवश्यक ठरलेल्या एल-१ए आणि बी प्रकारच्या व्हिसाच्या नामंजुरीचे अमेरिकेतील अलीकडचे प्रमाण खूप मोठे असल्याचे ‘फखौरी लॉ ग्रुप’चे प्रमुख रामा डी. फखौरी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या स्थिती सुधारणा न झाल्यास तेथे कार्यरत भारतीय कंपन्यांना मोठे व्यावसायिक व आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
अर्थात अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतरण सेवा (यूसीस) आणि होम लॅण्ड सिक्युरिटी या तेथे कार्यरत प्राधिकरणांना, अमेरिकेतील तरुण व्यावसायिकांची मोठी वानवा असल्याची पुरेपूर कल्पना आहे. माहिती-तंत्रज्ञान, आरोग्यनिगा सेवा, शिक्षण व संशोधन क्षेत्र, वित्तीय सेवा क्षेत्रांमधील ही तूट विदेशातून, प्रामुख्याने भारतीय व आशियाई मूळ असलेल्या व्यावसायिकांद्वारेच भरली जाईल, याचीही त्यांना जाणीव आहे. तरी व्हिसाच्या प्रश्नावर माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना कोंडीत पकडून, जबर शुल्कवसुली करण्याचे प्रत्येक प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. कामाच्या स्वरूपाचे, मुख्यत: विशेषज्ञतेचे अचूक वर्णन करून, अमेरिकेबाहेर विशेषरचित साधनांद्वारे सेवा दिल्याचा पुरेसा पूर्वानुभवाची अर्जातून स्पष्ट कल्पना देणारी माहिती व दस्तऐवजीकरण केले गेल्यास एल-१ए/ बी व्हिसा प्रायोजक कंपनीला मिळविण्यात अडचण नसल्याचे फखौरी यांनी सांगितले.
अमेरिकेत मिशिगनस्थित या कंपनीने आजवर अमेरिकेत कार्यरत असलेल्या अनेक भारतीय कंपन्यांना सल्लागार सेवा दिली आहे. कंपनीचे मुंबईत गेल्या ११ वर्षांपासून कार्यालय सुरू आहे.