‘जेनेरिक आधार’ या नवउद्यमी आस्थापनेतील निम्मा हिस्सा टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी विकत घेतला आहे.

ठाण्यातील १८ वर्षीय अर्जुन देशपांडे यांनी औषध विक्री साखळीसाठी नवउद्यमी कंपनीस सुरूवात केली. इतर ‘ऑनलाईन फार्मसी’पेक्षा ‘आधार जेनेरिक’ स्वस्त: दरात औषधे उपलब्ध करून देत असल्याचा दावा केला जातो.

रतन टाटा यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी अर्जुन देशपांडे यांच्याशी ‘जेनेरिक आधार’बद्दल चर्चा केली होती. त्यावेळेस रतन टाटा यांनी प्रस्तावासंदर्भात ऐकून घेतले होते, असेही देशपांडे यांनी सांगितले.

टाटा यांनी ही गुंतवणूक वैयक्तिक पातळीवर केली आहे. या गुंतवणुकीचा टाटा समूहाशी काहीही संबंध नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. रतन टाटा यांनी याआधीही ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युअरफीट, अर्बन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायब्रेट अशा असंख्य स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

‘जेनेरिक आधार’ने सध्या मुंबई, पुणे, बंगळूरू आणि ओडिशातील जवळपास ३० विक्री दालने जोडली आहेत. ‘जेनेरिक आधार’ हे दुकानांशी नफ्याची विभागणी करते. ‘जेनेरिक आधार’चे मुख्यालय ठाणे येथे आहे. ‘जेनेरिक आधार’मध्ये ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. यात औषधतज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञान अभियंते आणि विपणन व विक्री कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अर्जुन देशपांडे यांनी सांगितले की, ‘जेनेरिक आधार’ अंतर्गत वर्षभरात १,००० छोटय़ा आकाराची औषधाची दुकाने सुरू करण्याचा आणि उर्वरित महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली इत्यादी भागात विस्तार करण्याची योजना आहे.

‘जेनेरिक आधार’ मुख्यत: मधुमेह आणि रक्तदाबाशी संबंधित औषधांचा पुरवठा करते. कंपनी कर्करोगावरील औषधांचीही स्वस्त: दरात विक्री सुरू करणार आहे. पालघर, अहमदाबाद आणि नागपूर येथील औषध निर्मात्यांशी करार केले आहेत.

* अर्जुन देशपांडे यांच्या व्यवसायाला पालकांच्या मदतीने सुरुवात

* मुंबई, पुणे, बंगळूरू आणि ओडिशातील ३० विक्रेत्यांचा सहभाग

* वर्षभरात गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, दिल्लीत विस्तार योजना