News Flash

बँकांच्या थकीत कर्जात दिलासादायी सुधार

बँकांच्या थकीत कर्जाबाबतची स्थिती चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत सुधारली आहे.

 

रिझव्‍‌र्ह बँकेचा सहामाही अहवाल

बँकांच्या थकीत कर्जाबाबतची स्थिती चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत सुधारली आहे. सप्टेंबर २०१९ अखेरच्या पहिल्या अर्ध वित्त वर्षांत सर्व बँकांमधील ढोबळ तसेच निव्वळ थकीत कर्जाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. एकूण व्यापारी बँकांनी वितरित केलेल्या कर्जापैकी एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये ढोबळ थकीत कर्जाचे प्रमाण ९.१ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ११.२ टक्क्यांच्या तुलनेत ते कमी झाले आहे.

बँकांच्या निव्वळ थकीत कर्ज मालमत्तेचाही गेल्या सहामाहीत सुधार झाला आहे. याबाबतचे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या ६ टक्क्यांवरून सप्टेंबर २०१९ अखेरच्या सहामाहीत ३.७ टक्क्यांवर आले आहे. गेल्या सलग सात वर्षांतील वाढीनंतर यंदा सर्वच बँकांचे ढोबळ थकीत कर्ज प्रमाण कमी झाले आहे.

प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत मालमत्ता गुणवत्तेतील सुधारणेमुळे यंदा ढोबळ तसेच निव्वळ थकीत कर्ज प्रमाणात घसरण झाली असल्याचे निरीक्षण रिझव्‍‌र्ह बँकेच्या याबाबतच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ढोबळ थकीत कर्ज प्रमाण वर्षभरापूर्वीच्या १४.६ टक्क्यांवरून सप्टेंबर २०१९ अखेरच्या सहामाहीत ११.६ टक्क्यांवर आले आहे. तर त्यांचे या दरम्यानचे निव्वळ थकीत कर्ज प्रमाण ८ टक्क्यांवरून ४.८ टक्के झाले आहे.

खासगी बँकांबाबत, ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण मात्र ४.७ टक्क्यांवरून वाढत ५.३ टक्के झाले आहे. तर निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.४ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. एलआयसीने आयडीबीआय बँकेतील हिस्सा खरेदीनंतर सार्वजनिक बँकेचे रूपांतर खासगी बँकेत झाल्याने एकूणच खासगी बँकेच्या थकीत कर्ज मालमत्तांच्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. एलआयसीच्या संपादनानंतर, २१ जानेवारी २०१९ पासून आयडीबीआय बँकेचे स्वरूप खासगी बँक या रूपात झाले आहे.

सर्व बँकांचे कृषी कर्जातील ढोबळ थकीत कर्ज प्रमाण विविध राज्यांनी दिलेल्या कृषी कर्जमाफीमुळे वाढले आहे. तर उद्योग क्षेत्रातील थकीत कर्ज प्रमाण १७.४ टक्के असे सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले आहे. बँकांच्या एकूण थकीत कर्जापैकी ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठय़ा रकमेच्या थकीत कर्जाचा हिस्सा ९१ टक्के आहे. तर तीन महिन्यांपर्यंत थकीत असलेल्या कर्ज रकमेचा हिस्सा ८२ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 1:06 am

Web Title: half yearly report of reserve bank debt outstanding akp 94
Next Stories
1 निर्देशांक घसरणीचे सलग दुसरे सत्र
2 आर्थिक मंदीत संधी निश्चितच; मात्र शिस्त आणि संयमही आवश्यक!
3 निर्देशांकांची विक्रममाघार
Just Now!
X