नवी दिल्ली : विजया आणि देना या दोन सरकारी बँकांना सामावून घेऊन, देशातील तिसरी मोठी बँक म्हणून उदयास येत असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील विजया बँक व देना बँकांबरोबर एकत्रीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनंतर देशातील तिसरी मोठी बँक बनणार आहे. एकत्रित बँकेचा व्यवहार १ एप्रिल २०१९ पासून कार्यान्वित होऊ घातला असून, केंद्राच्या मंत्रिमंडळाने जानेवारीतच त्याला मंजुरी दिली आहे.

अधिया हे येत्या १ एप्रिलपासून बँकेची सूत्रे घेतील, असे वित्तीय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

योगा विषयात ‘पीएच.डी’ मिळविणारे अधिया केंद्रात महसूल विभागाचे सचिव म्हणून नोव्हेंबर २०१८ मध्ये निवृत्त झाले. अधिया हे भारतीय प्रशासन सेवेतील गुजरात कॅडरच्या १९८१ च्या तुकडीचे अधिकारी होते. पंतप्रधान होताच नरेंद्र मोदी यांनी त्यांना नोव्हेंबर २०१४ मध्ये केंद्रीय सेवेत  सामावून घेतले. सुरुवातीला अर्थ खात्यात बँक विभाग त्यांनी हाताळला. महसूल सचिव म्हणून वस्तू व सेवा करप्रणाली लागू करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यापूर्वी निश्चलनीकरणाचा निर्णय व अंमलबजावणीत ते एक महत्त्वपूर्ण अधिकारी राहिले आहेत. किंबहुना निश्चलनीकरणाबाबत पूर्वकल्पना असलेल्या पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांमध्ये अधिया एक होते, असेही मानले जाते.