कोळसा घोटाळ्यात नाव आल्यानंतर कुमारमंगलम बिर्ला यांनी प्रथमच जाहीर भूमिका मांडताना आपण अथवा आपल्या कंपनीने काहीही गैर केले नाही तेव्हा मी कशाला चिंता करू, असा माध्यमांनाच सवाल केला. या प्रकरणामुळे नवीन बँक परवान्यासाठी समूहाचा अर्ज फेटाळला जाईल, असाही आपण विचार करत नसल्याचे आदित्य बिर्ला समूहाच्या अध्यक्षांनी या वेळी सांगितले.
कोळसा घोटाळ्यात दोनच दिवसांपूर्वी नाव आलेल्या कुमारमंगलम बिर्ला यांनी शुक्रवारी राजधानीत केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली. अर्थमंत्रालयाचे मुख्यालय ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये या वेळी केंद्रीय महसूल सचिव सुमित बोसही उपस्थित होते.  बाहेर पडताच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कारवाईबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. काहीही गैर केले नसल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या घटनेमुळे आपल्याला नवीन बँक परवाना मिळताना अडचण होईल, असेही वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्र्यांबरोबर आपण या ताज्या तक्रारीबद्दल चर्चा केल्याचे बिर्ला यांनी सांगितले. या व्यतिरिक्त एक उद्योगपती म्हणूनही आपण विविध विषयांसंदर्भात बोललो, असेही ते म्हणाले.
सीबीआयने मंगळवारी बिर्ला यांच्यासह तत्कालीन केंद्रीय कोळसा सचिव पी. सी. पारख यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे.

तपास यंत्रणांनी पूर्ण खात्रीनंतरच कारवाई करावी : सीआयआय
तपास यंत्रणांनी भीतीचे वातावरण निर्माण करू नये अशी अपेक्षा व्यक्त करतानाच गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रत्यक्ष कारवाई करण्यापूर्वी अधिक सावध असावे, असे मत भारतीय औद्योगिक संघटनेने (सीआयआय) कोळसा घोटाळा प्रकरणात कुमारमंगलम बिर्ला यांचे नाव आल्याच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त केले आहे.   महासंघाचे अध्यक्ष के. गोपालकृष्णन यांनी याबाबत जारी केलेल्या पत्रकात कायद्याच्या संरक्षणार्थ सीबीआयला संबंधित व्यक्ती अथवा संस्था यांच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे; मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्यापूर्वी तथ्य जाणून घेऊनच पाऊल उचलावे, असे नमूद केले.